कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा दुकाने दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय! एसपींची यशस्वी शिष्ठाई

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : जिल्हा प्रशासनाचा आदेशाला केराची टोपली दाखवून दुकाने सुरु करण्याचा घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांनी मागे घेतला आहे. पुढील दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता व्यापारी प्रतिनिधींची पोलिस मुख्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत व्यापाऱ्यांची समजूत काढण्यात यश आले.
कोरोना महामारीला रोखण्यासाठी व्यापार्यांसह सर्वच घटकांनी आजवर प्रशासनाला सहकार्य केले आहे. भविष्यकाळातही संयमाची भूमिका घेऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी रविवारी केले होते.
कोरोना महामारीमुळे मार्चपासून व्यापार उद्योग व्यावसायिकासह सर्वच व्यवहार बंद आहेत. सर्वच घटकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे याचीही जाणीव आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अथक प्रयत्न होत असतानाही बाधित रुग्णांसह मृत्यूचा दरही वाढत आहे.
असे स्पष्ट करून बलकवडे म्हणाले, जिल्ह्यात लॉकडाऊनचा कडक अमल करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या घटकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. ही कारवाई टाळण्यासाठी व्यापारी संघटनांसह उद्योग, व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
शहर, जिल्ह्यात बाधितांची दैनंदिनी संख्या वाढत असतानाही नागरिकामध्ये निष्काळजीपणा दिसून येतो आहे. हा प्रकार स्वत:सह कुटुंबीयांना घातक ठरणारा आहे. मास्कचा वापर न करणार्यांची तसेच विनाकारण रस्त्यावर मोकाट वावरणार्यांचीही संख्या मोठी आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाईच्या सूचना जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला देण्यात आल्या आहेत, असेही बलकवडे यांनी सांगितले.