सातारा : पुढारी ऑनलाईन
अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा मतदानाचा फिव्हर कार्यकर्त्यांमध्ये अधिकच चढलेला पाहायला मिळत आहे. याचीच प्रचिती साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली. काल (दि.१८) सातारा येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भर पावसात सभा घेतली.
सातारा येथील जनतेला पवार संबोधित करत होते. त्याचवेळी पाऊस पडू लागाला. मात्र, पवार यांनी भाषण न थांबवता भर पावसात संबोधन सुरु ठेवलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागतासाठी साक्षात वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे सातारा जिल्हा चमत्कार घडवेल असा विश्वास मला वाटतो, असे शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.
तसेच, पवार यांनी जनतेला संबोधित करताना, आपल्या हातून काही चूक झाली तर ती मान्य करायची असते, लोकसभेच्या वेळी मी चूक केली हे मान्य करतो. मला आनंद हा आहे की ही चूक दुरुस्त करण्यासाठी सातारकर २१ तारखेची वाट बघत आहेत. श्रीनिवास पाटील यांना मोठ्या मतांनी विजयी करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पवार साहेबांनी लढलेल्या या लढाईची देशाचा इतिहास नोंद घेईल. साहेबांची ही लढाई येणाऱ्या पिढयांना कायम लढत राहण्याची प्रेरणा देईल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान शरद पवार साहेबांना ऐकत होतं. 'वारं फिरलंय, इतिहास घडणार', हा संदेश देणाऱ्या या सभेने राष्ट्रवादीच्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.