कडेगाव-पलूसमध्ये डॉ. विश्वजीत कदम यांची विजयी आघाडी  | पुढारी

कडेगाव-पलूसमध्ये डॉ. विश्वजीत कदम यांची विजयी आघाडी 

कडेगाव : शहर प्रतिनिधी 

सांगली जिल्ह्यातील कडेगाव-पलूस मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी आघाडी घेतली. 20 पैकी 12 व्या फेरी अखेर आमदार डॉ . विश्वजीत कदम यांना 1 लाख 35 हजार 258 मतांची आघाडी मिळाली. निकलापूर्वीच आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या विजय निश्चित झाल्याने कडेगाव-पलूस तालुक्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. दिवाळी पूर्वीच  फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. 

आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी मतमोजणी दिवशी सकाळी सोनहीरा करखान्यावरील दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर आई विजयमाला कदम, आमदार मोहनराव कदम यांचे आशीर्वाद घेऊन सोनसळ येथील चौरंगीनाथ व उदगिरी देवीचे दर्शन घेतले. कडेगाव येथील अद्योगिक वसाहतीतील शासकीय प्रशिक्षण संस्था येथे मतमोजणी सकाळी 8 वा सुरू झाली. मतमोजणीवेळी पहिल्या फेरीपासूनच आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी विक्रमी आघाडी घेतली आहे. 

डॉ.विश्वजीत कदम हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिल्याने कार्यकर्त्यांनी सकाळी 9 वा पासून मतदारसंघातील गावागावात गुलालाची उधळण केली. तर मतमोजणी ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करीत ढोल ताशांच्या गजरात निकलापूर्वीच गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. 

कडेगाव शहरात महिलांनी फुगडीचा ताल धरत आनंदोत्सव साजरा केला. त्याचबरोबर कडेगाव येथील काँग्रेस कार्यकर्त्यानी काँग्रेसकमिटी समोर मोठी गर्दी केली. यावेळी ‘डॉ पतंगराव कदम यांच्या माघारी आता आपली जबाबदारी” असे म्हणत “आमदार डॉ. विश्वजीत कदम जिंदाबाद वि श्वजित कदमांचा विजय असो, अशा घोषणा देत परिसर दणाणून काढला”. यावेळी विश्वजीत कदम यांना क्रेनच्या साहाय्याने फुलांचा हार घालण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत सर्वांचे आभार मानले. दरम्यान डॉ. पतंगराव कदम यांच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले.

     

 

Back to top button