नंदूरबार : नवापुरात पुन्हा बर्ड फ्लू; लाखो कोंबड्यांची होणार कत्‍तल  | पुढारी

नंदूरबार : नवापुरात पुन्हा बर्ड फ्लू; लाखो कोंबड्यांची होणार कत्‍तल 

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणत कोंबड्या मृत आढळल्‍या आहेत. त्‍यामुळे 4 पोल्ट्री फार्ममधील 8 नमूने तपासण्यासाठी घेतले होते. यातील एच-5 एन-8 पॉझिटीव्ह म्हणजेच बर्ड फ्लू म्‍हणून आले आहेत. त्‍या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्रातील सर्व कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने कत्तल करावी आणि पोल्‍ट्री मधील अंडी, पक्षीखाद्य नष्ट करून त्याची देखील विल्हेवाट लावण्याचे निर्देश जलद कृती दलाला देण्यात आले आहेत. 

यामुळे लाखो कोंबड्यांची कत्तल होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, 15 वर्षापूर्वीच्या संकटाची पुनरावृत्ती झाली आहे. पंधरा वर्षांपूर्वी नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रसार झाल्यामुळे गावागावातील कोंबड्या वेचून मारण्यात आल्या होत्या. दरम्यान काल (शनिवार) सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी  संसर्ग केंद्रापासून 1 किलोमीटरचे त्रिज्येतील क्षेत्र बाधित क्षेत्र आणि 10 किमी त्रिज्येतील क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केले.(bird flu cases confirmed in Navapur taluka in Nandurbar lakh of hens will be slaughtered)

अधिक वाचा : संजय राऊत म्हणाले की, ‘आपल्या देशात देशद्रोहाचा कायदा कमालीचा स्वस्त…’

नवापूरमधील न्यू डायमंड पोल्ट्री फार्म, परवेझ पोल्ट्री फार्म, अरिफभाई पालवाला वासिम पोल्ट्री फार्म आणि मोहम्मदभाई अब्दुल सलाम आमलीवाला पोल्ट्री फार्म अशा चार पोल्ट्रीमधील नमुना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत 31 हजार 833 कोंबड्यांचा मृत्यू झाला असून, सुमारे 8 लाख 74 हजार 598 पक्षी नवापूर तालुक्यातील विविध पोल्ट्री फार्ममध्ये आहेत. निगराणी क्षेत्रातील कोंबड्या, अंडी व पक्षीखाद्य यांचे निगराणी क्षेत्राबाहेर वाहतूक, खरेदी-विक्री, तसेच बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास 90 दिवसापर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच 10 किमी त्रिज्येच्या परिसरातील गावे आवागमन प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

बाधित  क्षेत्रातील कत्तल केलेल्‍या कोंबड्या व नष्ट करण्यात आलेल्या कोंबड्याची अंडी व पक्षी यांचा जागेवरच जलद कृती दलासमक्ष पंचनामा करण्यात येऊन त्वरीत अहवाल सादर करावा. नुकसान भरपाईसाठी अहवालाची पूर्ण खात्री करून शेतकरी व कुक्कुट व्यावसायिकांना नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याची कार्यवाही विना विलंब करण्यात यावी. बाधित क्षेत्रात रिकामे करण्यात आलेले सर्व पक्षीगृहांचे आवश्यक जैवसुरक्षेसह 2 टक्के सोडियम हायपोक्लोरेट, पोटॅशिअम परमँगनेटद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

अधिक वाचा : अलिबागच्या पांढर्‍या गोड कांद्याला मिळणार ‘जीआय’ मानांकन

निगरणी क्षेत्राच्या ठिकाणी वाहनाच्या ये-जा करण्यास मनाई करण्यात यावी व त्या ठिकाणची खाजगी वाहने प्रसारीत क्षेत्राच्या बाहेर लावण्यात यावी. निगराणी क्षेत्रातील जिवंत  अथवा मृत पक्षी, अंडी, कोंबडी खत, पशुखाद्य व अनुशंगीक साहित्य व उपकरणे यांच्या वाहतूकीस मनाई करण्यात यावी. व्यावसायिक पोल्ट्री फार्ममध्ये मालक व कर्मचारी यांनी योग्य ती खबरदारी घेऊन कामकाज करावे. फार्म सोडतांना स्वत:चे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.

निगराणी क्षेत्रात नगारिकांच्या हालचाली तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतूकीस नियंत्रित करण्यात यावे. निगराणी क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. उघड्यावर मृत पक्षी किंवा कोंबडी टाकू नये. तसेच त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांनी लावावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अधिक वाचा : सांगलीत काँग्रेस गटनेते बदलावरून वादंग

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीची बैठक

जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पक्षी शास्त्रीय पद्धतीने कत्तल करणाऱ्या पथकांना औषधे, पीपीई कीट, मास्क तसेच आवश्यक साहित्य तात्काळ देण्यात यावे. त्यासाठी आरोग्य पथकाची नेमणूक करावी. नियंत्रण कक्षाची तातडीने सुरूवात करण्यात यावी. बाहेरून कुक्कुट पक्षी शहरात येणार नाही याची खबरदारी घ्यावी. पशुसंवर्धन विभागाने परिसरात बर्ड फ्लूबाबत जनजागृती करावी. पोल्ट्री कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सुचनेनुसार आवश्यक कालावधीसाठी विलगीकरणात ठेवण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे,  तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते.

Back to top button