मुंबई : पुढारी ऑनलाईन
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानत आनंद व्यक्त केला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील नेत्यांनी निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्विट करत म्हटले आहे की, राज्यघटनेतील तत्वे व लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार! हा निकाल योगायोगाने संविधान दिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या देशात न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. न्यायालयात आम्ही जे बोलत होतो, ते सत्य होते. न्यायालयाच्या निकालाने ते खरे ठरले आहे. सत्याचा विजय झाला आहे, असे संजय राऊत म्हणाले.