पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये सध्या होळी व धुळवडीचा फिव्हर चढला आहे. कोरोना संसर्गामुळे दोन वर्षानंतर बाजारात विविध रंग आणि लहान मुलांना आकर्षित करणार्या विविध आकार आणि प्रकारातील पिचकार्या विक्रीस ठेवल्या आहेत.
होळी व धुलीवंदन येताच दरवर्षी बाजारात पिचकार्या, रंग व अनेक प्रकारच्या वस्तू बाजारात येतात. पिंपरी बाजारात पारंपरिक व नैसर्गिक रंग, फॅन्सी आणि कार्टुन पिचकार्यांनी दुकाने सजली आहेत.
दरवर्षीप्रमाणे गन, टँक, सिलिंडर आणि पाईपसह कार्टुन व सेलिबि—टींचे चित्र असणार्या पिचकार्या बाजारात दाखल झाल्या आहेत. पिचकार्यांची किंमत 20 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहे.
यामध्ये छोटा भीम, टँक, मोटू-पतलू, अँग्रीबर्ड, डोरेमॉन, वॉटर गन, शूटर पंप, एअर व मशीन गनसारख्या पिचकार्या मुलांना आकर्षित करीत आहेत.
लहान मुले व युवक वर्ग यांच्यासाठी हा सण म्हणजे धमाल मस्ती करण्याची मोठी संधी असते. सकाळपासूनच टोळक्याने फिरून रंगबेरंगी रंग पिचकार्यात भरून लहान मुले व तरूणवर्ग अगदी उत्सूक झालेलेे असतात.रंग नाही मिळाला तर नुसत्या पाण्यांनी तरी भिजवायचे पण धमाल मस्ती करायची व मनसोक्त रंगात भिजायचे.
गल्लीतून, रस्त्यातून एकमेंकांवर दबा धरुन बसायला आणि पिचकारीमध्ये रंग भरुन एकमेकांना निशाणा करण्यासाठी लहान मुले आता सज्ज झाली आहेत. बाजरातील पिचकार्यांच्या दुकानांमध्ये लहानग्यांची पिचकार्या खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.