मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात शनिवारी रात्री पिसाळलेल्या लांडग्याने धिंगाणा घातला. यात तालुक्यातील पौट, बावची, सलगर खु., जित्ती परिसरामध्ये शनिवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत गाय, म्हैस, कुत्री तसेच 12 गावकर्यांवर हल्ला करीत जखमी केले.
दरम्यान, संतप्त गावकर्यांनी सलगर खु. येथे त्या नरभक्षक लांडग्याला हुसकावून लावण्यासाठी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेला तो लांडगा ठार झाला आहे. तर जखमी गावकर्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
जखमींमध्ये पौट येथील भारत विठोबा म्हमाणे (वय 50), यश राजाराम फोंडे (वय 15), सुखदेव सिध्दू जाधव (वय 60), तानाजी श्रीरंग चव्हाण (वय 30), पार्वती इराप्पा माळी (वय 28) हे सर्व रा. बावची. तर आईकडे आलेल्या अनुसया माळी (वय 35) रा. लवंगी, जयहिंद तुकाराम खडतरे (वय 37), अक्षय जयहिंद खडतरे (वय 12), संगिता जयहिंद खडतरे (वय 30), तुकाराम खडतरे (वय 75), जित्ती येथील काशीनाथ लक्ष्मण बंडगर, सुंदराबाई गजेंद्र पांढरे हे रा. सलगर खुर्द यांचा समावेश आहे.
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये माळेवाडी, लवंगी, भोसे, बावची परिसरात वनक्षेत्र आहे. तेथील वनक्षेत्र सोडून लांडग्याने मानवी वस्तीत प्रवेश केला. त्यानंतर त्याने केलेल्या हल्ल्यामुळे सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याअगोदर शेळ्या, बकर्या, मेंढ्यांवर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. बहुतांश वनक्षेत्राला तारेचे संरक्षक तारेचे कुंपण नाही. त्यामुळे संरक्षण क्षेत्र सोडून लांडगा नागरी वस्तीत शिरला. शनिवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून या पिसाळलेल्या लांडग्याने पौट येथे भारत विठोबा म्हमाणे यांच्या वस्तीवर भारत यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर बावची परिसरातील लोकांना चावा घेत जखमी केले आहे. तर काहींचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही लांडग्याने केला आहे. त्यानंतर लांडग्याने आपला मोर्चा सलगर खुर्द गावाकडे वळविला. घराच्या व्हरांड्यात झोपलेल्या खडतरे कुटुंबीयांना जखमी केले. या प्रकाराने संतप्त गावकर्यांनी लांडग्यावर हल्ला केला. त्यात लांडग्याला ठार केले.