

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : नेहमी भक्तांनी गजबजलेल्या नागनाथाच्या मंदिरात शनिवारी (दि. १२) दुपारी पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसून आला. या फोैजफाट्याने भागात दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी यंत्रणा सतर्क झाल्याची कुनकून आजूबाजूच्या नागरीकांना लागली. यामुळे नागरिकांचे काही क्षण भांबावलेले, गोंधळलेले होते. ज्यांना घटनेची माहितीच नव्हती ते पोलीसांची गर्दी कशामुळे? याची उत्सुकतेने चर्चा करीत होते. काही क्षणातच दहशतवादी असल्याचे भासविणार्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर ही रंगीत तालीम असल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. १२) येथील नागनाथ मंदिरात दहशतवादी हल्ल्याप्रसंगी अनुसरावयाची कार्यपद्धती यानिमित्ताने रंगीत तालीम घेण्यात आली. दोन बनावट दहशतवादी हे मंदिर परिसरात लपून बसल्याचे भासवून त्यांना पोलीस रेस्क्यु टिमने सर्व उपाययोजना करून ताब्यात घेतले. ही संपूर्ण रंगीत तालीम एक थरार होता. अचानक पोलिसांचा फौजफाटा मंदिर परिसरात आल्याने अनेकांच्या मनात धडकी भरली. अत्यंत शिताफीने पोलीसांनी घुसलेल्या दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर ही पोलीसांची रंगीत तालिम असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरीकांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर बीडीडीएस पथकाकडून मंदिर परिसराच्या सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली.
या रंगीत तालिममध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत देशपांडे, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण मळघणे, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लु, पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, दहशतवादी विरोधी शाखा, दहशतवाद विरोधी पथक, क्युआरटी, आरसीपी पथक व औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी सहभाग घेतला.