

सातारा : पुढारी वृत्तसेवा
संपातील बहुतांशी एसटी कामगार सेवेमध्ये पुन्हा परतल्याने एसटीची जिल्ह्यातील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. मात्र, सातारा विभागातील विविध आगारांमधील एसटीची वारी डिझेलसाठी खासगी पंपाच्या दारी दिसू लागली आहे. त्यामुळे खासगी पंपांवर आता एसटीच्या रांगा दिसत आहेत. खासगी पंपाच्या तुलनेत शासकीय खरेदीसाठी लिटरमागे 22.61 रुपये जादा मोजावे लागत आहेत. यामुळे खासगी पंपावरून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
सातारा विभागात सुमारे 700 हून अधिक बसेस आहेत. त्यांच्या विविध मार्गावर फेर्या होतात. त्यासाठी दररोज हजारो लिटर डिझेलची आवश्यकता असते.मात्र एसटी महामंडळास घाऊक दराने डिझेल पुरवठा करण्यासाठी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम यांच्यासोबत प्रथम 3 वर्षांचा 10 जानेवारी 2022 पर्यंत करार केला होता. या करारामधील अटीनुसार पुढील दोन वर्षे मुदतवाढ देण्याची तरतूद करण्यात आली होती. दि. 16 मार्च रोजी इंडियन ऑईलने सादर केलेल्या दरपत्राची तुलना केली असता खाजगी डिझेल पंपावरील डिझेल विक्रीचे दर व महामंडळास पुरवठा करण्यात आलेले दर यामध्ये 22.61 रुपये जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव खंडाळा, कोरेगाव, दहिवडी, वडूज, मेढा, फलटण या 11 आगारामधील एसटी बसेस त्या त्या आगाराच्या जवळ असणार्या खासगी पंपावर डिझेल भरू लागल्या आहेत. त्यामुळे महामंडळाचा तोटा कमी होवू लागला आहे.
संपामुळे साडेपाच महिन्यांपासून एसटी महामंडळाला घरघर लागली होती. यातच पुन्हा इंधनाच्या दरात वाढ झाल्याने अगोदरच तोट्यात असलेल्या लालपरीला जास्तीचा भुर्दंड बसत आहे. यातून मार्ग काढत शासनाने खासगी पंपावरून डिझेल भरण्याचे आदेश विभागातील प्रत्येक आगाराला देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आगारातील बसेसला त्यांच्या जवळच्या पंपावर डिझेल किरकोळ दराने मिळण्यासाठी पंपचालकांकडून कोटेशन मागवण्यात आले होते. त्यात ज्या पंप चालकांनी किरकोळ दरातही काही प्रमाणात सवलत दिली, अशा पंपावरून डिझेल भरून घेण्यास प्रारंभ झाला आहे. यापूर्वी महामंडळाने 2013-14 यावर्षीही असा प्रयोग केला होता. घाऊक दरापेक्षा किरकोळ दर कमी असल्याने काही महिने खासगी पंपावरून डिझेल खरेदी करण्यात आले होते. आताही तशीच स्थिती निर्माण झाल्याने महामंडळाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे सातारा विभागातील एसटीची वारी डिझेलसाठी खासगी पंपाच्या दारी पोहोचली असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.