

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय स्तरावर डबेवाल्यांचे असलेल्या नावलौकिकाला साजेशी वास्तू आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित होत आहे. देश- विदेशातील विद्यार्थी व पर्यटकांसाठी एक अत्याधुनिक आणि सुसज्ज असे डब्बावाला एक्सपेरियन्स सेंटर हे मुंबईतील एक नवीन पर्यटनस्थळ म्हणून लवकरच अनुभवण्यास मिळणार आहे.
सातासमुद्रापार डबेवाल्यांच्या अचूक नियोजन कौशल्य व वेळेच्या व्यवस्थापनाची पसरलेली ख्याती आणि अनेक देशातील नागरिक विद्यार्थी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नामांकित कंपन्या व अनेक देशांचे राजदूत,मंत्री राष्ट्राध्यक्ष यांनी भेट देत डबेवाल्यांच्या कार्याची प्रशंसा केलेली आहे.डबेवाले यांच्यासाठी देवदूत बनलेले डबेवाल्यांचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी आपल्या आमदार निधीतून २ कोटी रुपये मंजूर करून या वास्तूचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले गेले याप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक्सपिरीयन्स सेंटर हे एक संग्रहालय म्हणून सुद्धा नावारूपाला यावे, यासाठी निधीची कमतरता बसल्यास वाढीव निधीची तरतूद करु.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कामासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून वाढीव ५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद व दिलेला शब्द खरा ठरविल्याबद्दल डबेवाले ट्रस्ट अध्यक्ष उल्हास मुके, मंडळ अध्यक्ष रामदास करवंदे व समस्त कार्यकारिणी तसेच संबंध डबेवाले कामगार प्रवक्ते विष्णू काळडोके यांनी,उपमुख्यमंत्री फडणवीस ,आमदार श्रीकांत भारतीय यांचे आभार मानले.