

भारताने गेल्या आठवड्यात आशिया चषक जिंकताना आपल्या विश्वचषक तयारीच्या बहुतांशी उद्दिष्टांची पूर्तता केली होती, राहिले होते ते आपली राखीव फळी तपासण्याचे. ते काम आपल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहालीच्या विजयाने पूर्ण केले. पाच प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणार्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा सहज पराभव करताना आपल्या राखीव फळीची बलस्थाने दाखवली.
आशिया चषकात आपल्या फलंदाजीची तयारी दिसलीच, पण आपली राखीव फळी तपासायची या मालिकेने संधी दिली आहे. चीनमध्ये चालू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असणार्या ऋतुराज गायकवाडने या सामन्यात उत्तम खेळी करत सुवर्णपदकासाठी चीनला रवाना होण्यापूर्वी उत्तम सराव केलाच, पण विश्वचषकाच्या राखीव फळीत पर्यायी सलामीचा फलंदाज म्हणून आपले नाव नक्की केले. विश्वचषकाच्या संघात रोहित शर्मा, गिल आणि इशान किशन सारखे सलामीचे पर्याय असताना ऋतुराज हा राखीव फळीतच असेल, पण कुठच्याही संघव्यवस्थापनाला दीड महिना चालणार्या स्पर्धेसाठी सशक्त राखीव फळी असणे हे नक्कीच सुखावह असते.
मोहम्मद शमीने सुरेख गोलंदाजी करत पूर्ण गोलंदाज शमी का, फलंदाजीला उपयुक्त शार्दूल ठाकूर या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एक दिवसीय सामना जिंकायला प्रतिस्पर्ध्याचा डाव बाद करणे किंवा टिच्चून गोलंदाजी करत धावा रोखणे यासाठी संघात उत्तम उपलब्ध गोलंदाजांचा समावेश असणे गरजेचे आहे. भारताच्या विश्वचषकाच्या संघात बुमराह, सिराज यांच्या जोडीला शमीच हवा हे शमीने आपल्या गोलंदाजीने दाखवून दिले. आपली फलंदाजी सक्षम असेल तर थोड्याफार धावा करणार्या गोलंदाजापेक्षा हमखास थोडेफार बळी मिळवून देणारा गोलंदाज संघाच्या समतोलासाठी जास्त योग्य असतो हेच शमीने सिद्ध केले. पहिले सहा-सात फलंदाज जर कामगिरी करू शकत नसतील तर आठव्या क्रमांकाच्या गोलंदाजाकडून फलंदाजीच्या कामगिरीची अपेक्षा ठेवणे म्हणजे गोलंदाजी कमकुवत करण्यासारखे आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना मालिकेचा भाग असला तरी दोन्ही संघ या मालिकेकडे विश्वचषकाची तयारी म्हणूनच बघत असल्याने अनेक प्रयोग करण्यावर भर असणार आहे. भारताच्या मधल्या फळीत श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव का इशान किशन या प्रश्नाचे उत्तर अजून मिळालेले नाही. श्रेयस अय्यर या सामन्यात पुन्हा अपयशी ठरला. दुखापतीनंतर पुन्हा मैदानात परतणार्या अय्यरकडून मोहालीच्या प्रचंड उकाड्यात फलंदाजी झाली असती तर त्याचा आत्मविश्वास आणि संघव्यवस्थापनाचा त्याच्यावरचा विश्वास दोन्ही प्रस्थापित झाले असते. अय्यर अपयशी ठरला तरी सूर्यकुमार यादवला अखेर फॉर्म गवसला. ग्रीनला मारलेला षटकार वगळला तर सूर्याने या डावात बहुतांशी फटके हे विकेटच्या समोर ड्राईव्ह आणि कट मारले. स्विपचा मोह या सामन्यात त्याने आवरला होता कदाचित हेच त्याच्या फॉर्म गवसण्याचे कारण असेल. आक्रमणाऐवजी प्रत्येक चेंडू त्याच्या गुणवत्तेप्रमाणे खेळत सूर्याने टी-20 मानसिकतेतून एक दिवसीय सामन्यासारखी फलंदाजी केली हे विशेष होते.
या सामन्यातील सर्वात मोठा प्रयोग होता तो म्हणजे अश्विनला खेळवण्याचा. गेल्या दोन वर्षांत तो दोन एकदिवसीय सामने खेळला आहे, पण अश्विनसारख्या गोलंदाजाला मॅच प्रॅक्टिस, लाल किंवा पांढरा चेंडू यांचा विशेष फरक पडत नाही. आपल्याला विश्वचषकाच्या संघात ऑफस्पिनर हवा हे उशिरा सुचलेले शहाणपण आपल्याला अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर पर्यंत घेऊन आले आहे. वॉशिंग्टन सुंदरला आशिया चषकाच्या अंतिम सामन्याला तडकाफडकी बोलावले, पण सिराजने त्याला गोलंदाजीची संधीच दिली नाही. अश्विन 2017 मध्ये ईडन गार्डन्सला इंग्लंडविरुद्ध याआधी भारतात एक दिवसीय सामना खेळला होता आणि 2017 ते 2023 मध्येही त्याने 6 वर्षांत त्याने फक्त 8 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यात अश्विनने उत्तम लय पकडत गोलंदाजी करत लाबूशेनचा बळी मिळवला. इतका कमी सामन्यांचा सराव असूनही आज अश्विन संघात असावासा वाटतो तो त्याच्या गोलंदाजीतील बुद्धिमत्ताचातुर्याने. जर बळी मिळत नसतील तर त्याच्या कल्पकतेने तो धावा तरी नक्कीच रोखून ठेवेल. फलंदाजी करू शकणारा गोलंदाज का उत्तम गोलंदाज तिढा जसा शार्दूल ठाकूर का शमी यांच्याबाबत आहे तसाच अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर बाबत आहे, पण फलंदाजीवर विश्वास असेल तर उत्तम गोलंदाज या न्यायाने शमी सारखेच अश्विनलाच प्राधान्य असले पाहिजे.
अश्विनला बळी मिळाला तो थोडासा सुदैवाने, कारण यष्टिरक्षक राहुलच्या हातातून चेंडू सुटला होता, पण नशिबाने तो स्टम्पला लागला. याच कारणासाठी विश्वचषकात यष्टिरक्षणाचे काम आपल्याला किशन आणि राहुल यांच्यात वाटून द्यावे लागेल. एक स्टम्पिंग किंवा झेल सुटणे हे महागात जाऊ शकते. राहुल हा जरी उत्तम यष्टिरक्षण करत असला तरी तो नैसर्गिक यष्टिरक्षक नाही. यामुळे जसजसा सामन्यांचा दबाव वाढेल तेव्हा त्याच्याकडून अति यष्टिरक्षणाने चुका होणे स्वाभाविक आहे. यासाठीच राहुलला आराम देण्यासाठी किशनला संधी दिली पाहिजे. आजच्या सामन्यात तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना संधी देऊन राखीव फळीचे सर्व निकष तपासले जाण्याची शक्यता आहे. राहुल कर्णधार असल्याने त्याला यष्टिरक्षणाचा सराव मिळेल, पण आराम मिळणार नाही. तेव्हा तिलक वर्माला संधी द्यायची म्हणजे किशनला बाहेर बसावे लागेल. शार्दूल ठाकूरच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदर आणि अश्विन दोन्ही ऑफस्पिनर खेळवायचा प्रयोग आपण करू शकतो. तिसर्या सामन्यासाठी भारताचे मुख्य खेळाडू परततील तेव्हा विश्वचषकाचा सराव आणि विश्वचषकाच्या संघात अंतिम फेरफार करायला जे काही तपासायचे आहे त्यासाठी हा सामना हा शेवटचा प्रयोग आहे.