

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : fertility rate : देशात सर्व धर्मिय नागरिकांचा विचार केल्यास मुस्लिमांचा प्रति नागरिक जन्मदर सर्वात जास्त आहे, असा दावा 'प्यु रिसर्च सेंटर' संस्थेने एका अहवालाअंती केला आहे.
संस्थेकडून करण्यात आलेल्या अहवालातून देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसून आली आहे. अहवालानुसार स्वातंत्र्यानंतर भारतातील मुस्लिमांच्या लोकसंख्येत सात पटीने वाढ झाली.
अहवालानुसार स्वतंत्र भारतात १९५१ मध्ये एकूण लोकसंख्येतील हिंदू लोकसंख्येचे प्रमाण ८४.१ % होते. पंरतु, २०५० मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण ७६.४ टक्क्यांवर येईल. देशाच्या एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचे प्रमाण १९५१ मध्ये ९.८% होते.
पंरतु, २०२० मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचे प्रमाण १५ % झाले. आता २०५० मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचे प्रमाण १८.३५% असेल, असे भाकिते अहवालातून नोंदवण्यात आले आहेत.
मुस्लिमांच्या लोकसंख्येतील वाढीचा ओघ बघता २०५० पर्यंत भारतात मुस्लिमांच्या लोकसंख्येत दहा पटीने वाढ होण्याची शक्यता अहवालातून वर्तवण्यात आली आहे. देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, त्या सुमारास देशात ३ कोटी मुस्लिम होते. २०२१ मध्ये भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या २१ कोटी आहे. या लोकसंख्येत आणखी वाढ होईल आणि २०५० पर्यंत भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या ३१ कोटी पर्यंत पोहचेल, असा निष्कर्ष अहवालात नोंदविण्यात आला आहे.
मुस्लिमांच्या तुलनेत हिंदू लोकसंख्येतील वाढीचा वेग कमी आहे. संपूर्ण देशाचा प्रति नागरिक जन्मदर २.२ आहे. हिंदूंचा प्रति नागरिक जन्मदर २.१ आहे तर मुस्लिमांचा प्रति नागरिक जन्मदर २.६ आहे. भारताची एकूण लोकसंख्या २०५० पर्यंत १७० कोटी असेल. या लोसंख्येतील मुस्लिमांचा वाटा २०२१ च्या तुलनेत २०५० मध्ये वाढला असेल.
भारतात २००१ ते २०११ दरम्यान २४ राज्यांतील हिंदू लोकसंख्येच्या प्रमाणात घट झाली. याच काळात देशातील २६ राज्यांमध्ये मुस्लिमांच्या लोकसंख्येत वाढ झाली. मणिपूरमधील हिंदू लोकसंख्येचे प्रमाण ४.६ टक्क्यांनी कमी झाले.
आसाममधील हिंदू लोकसंख्येचे प्रमाण ३.४ टक्के, बंगाल १.९ टक्क्यांनी कमी झाले. तर, आसाम ३.३ टक्के, उत्तराखंड २ टक्के, केरळ १.९ टक्के तसेच बंगालमध्ये मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण १.८ टक्क्यांनी वाढले, असा दावा संस्थेकडून करण्यात आला आहे.
अमेरिकेत प्रति नागरिक जन्मदर १.७ टक्के, इंग्लंडमध्ये प्रति नागरिक जन्मदर १.६ टक्के, यूएईमध्ये प्रति नागरिक जन्मदर १.४ टक्के, कतारमध्ये प्रति नागरिक जन्मदर १.८ टक्के आहे.
कट्टर मुस्लिम देश समजल्या जाणाऱ्या सौदी अरेबियात तसेच सर्वाधिक मुस्लिम असलेल्या इंडोनेशियात प्रति नागरिक जन्मदर २.३ टक्के आहे, असे संस्थेकडून अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचलं का?