‘घड्याळ तेच वेळ नवी’, राष्ट्रवादीचा संवाद मेळावा नवपर्वात नवा महाराष्ट्र घडवूया : सुनील तटकरे

‘घड्याळ तेच वेळ नवी’, राष्ट्रवादीचा संवाद मेळावा नवपर्वात नवा महाराष्ट्र घडवूया : सुनील तटकरे
Published on
Updated on
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आपल्याला नव्या विचाराला साथ देण्याचे काम करतानाच नवपर्वात नवा महाराष्ट्र घडवायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी  केले.
महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचारांशी फारकत न घेता आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो असे सांगतानाच कॉंग्रेसशी फारकत घेत परकीय व्यक्तीचा मुद्दा उपस्थित करत कॉंग्रेसच्या विरोधात गेलो. ज्या पक्षाशी फारकत घेतली त्याच पक्षासोबत त्यानंतर सत्ता स्थापन केली. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकींचा निकाल हाती यायचा होता. आम्ही पवारसाहेबांकडे बसलो. त्यावेळी आम्हाला भाजपला बाहेरुन पाठिंबा द्यायला सांगण्यात आले. भाजपने पाठिंबा मागितला नव्हता ही बाबही आवर्जून  तटकरे यांनी आज  पुन्हा एकदा उघड केली.
२०१९ मध्ये एकत्रित शिवसेना भाजपने निवडणूक लढवली. एकहाती सत्ता असताना दोन्ही पक्षात वितुष्ट आले. मात्र सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला आणि आम्हीही दिला हे सांगतानाच २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपसोबत जाण्यासाठी तयार होते तशा सहयासुध्दा झाल्या होत्या. परंतु निर्णय झाला नाही असेही तटकरे म्हणाले.
आघाडीच्या राजकारणात भिन्न विचारसरणीचे पक्ष असले तरी भिन्न विचाराचे लोक एकत्र येतात. २०१९ मध्ये आम्ही शिवसेनेसोबत युती करु शकतो तर मग आता आम्ही भाजप युतीत गेलो तर आमचे काय चुकले असा सवालही उपस्थित केला.
बंडखोरी ज्यांच्या रक्तात आहे ते बंगल्यावरील नेते आम्हाला फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार शिकवायला लागले आहेत. पक्षनिष्ठा कुणी मला शिकवू नये. आत्मकेंद्रित राजकारणामुळे इथे पक्ष वाढला नाही. आपली जागा निवडून आणण्यापलीकडे काही करु शकत नाही त्यांनी अजितदादा पवार यांच्यावर बोलू नये असा जोरदार टोलाही तटकरे यांनी लगावला. आता अजितदादांचे पर्व सुरू होत असून त्याला वैदर्भीय लोकांची साथ द्यावी. संयमाने वाटचाल सुरू केली तर ताकदीने पक्ष उभा होईल असे आवाहनही तटकरे यांनी केले. आज या राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ नागपूर या ऐतिहासिक शहरातून फोडत असल्याचे तटकरे म्हणाले.
'घड्याळ तेच वेळ नवी'… या टॅगलाईनखाली 'निर्धार नव्या पर्वाचा' हा कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी दौर्‍याला आजपासून सुरुवात करण्यात आली.  पूर्व विदर्भातील सहा जिल्हयात 'निर्धार नवपर्वाचा' सुरू केला असून याची सुरुवात नागपूर शहरात कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्याने झाली.
या मेळाव्याला अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, माजी मंत्री सुबोध मोहिते, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस अविनाश काकडे, राष्ट्रीय सचिव व नागपूर निरीक्षक राजेंद्र जैन, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, शहराध्यक्ष प्रशांत पवार, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, प्रदेश सचिव अनिल अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, युवक शहराध्यक्ष विशाल खांडेकर, कार्याध्यक्ष रवी पराते, ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, महिला आयोगाच्या सदस्या सौ. आभा पांडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news