

कोल्हापूर : प्रवीण मस्के
पहिल्या महायुद्धापासून पाकिस्तान, चीन, शांती सेना, कारगिल युद्धात देशाचे रक्षण करत कोल्हापूर जिल्ह्यातील वीर जवानांनी लढाईचे मैदान गाजवले आहे. युद्धात लढताना प्राणांची आहुती देत आजपर्यंत 185 जवान शहीद झाले आहेत. त्यांना भारत सरकारने मरणोत्तर कीर्ती, वीरचक्राने सन्मानित केले आहे. कोल्हापूरला सैनिकी परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील सैनिक टाकळी (ता. शिरोळ), गिरगाव (ता. करवीर) हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. भारतीय सैन्य दलात सहभागी होऊन देशसेवा करण्याचे काम आजतागायत सुरू आहे.
हवालदार शिवाजी कृष्णा पाटील यांचा जन्म म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे झाला. दहावीपर्यंतपर्यंतचे शिक्षण गावात झाल्यावर 1972 ला बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये सैन्यात भरती झाले. 20 जुलै 1986 ला राज्यस्थानमध्ये महापूर व पावसाने थैमान घातले होते. 29 जुलै रोजी काही नागरिक व सैनिकांना घेऊन बोट सुरक्षित ठिकाणी जात असताना बोटीच्या खालच्या बाजूस मोठा दगड धडकल्याने बोट उलटली. पाटील यांनी बोट सरळ करून दोन सैनिकासह काही नागरिकांना वाचवले. यावेळी ते स्वत: पाण्याच्या मोठ्या भोवर्यात सापडले. यातून त्यांना बाहेर पडता आले नाही. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांना हौतात्म्य आले. मरणोत्तर त्यांना भारत सरकारने कीर्ती चक्र देऊन सन्मानित केले. महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही त्यांना गौरविले आहे.
सुभेदार सीताराम नारायण पाटील यांचा जन्म 1942 ला शिरोली (ता. चंदगड) येथे झाला. 1960 भारतीय सैन्यात भरती झाले. त्यांचा 1962 चे चीन युद्ध, पाकिस्तानबरोबरचे 1970-71 च्या युद्धात सहभाग होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंका येथे शांतीसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. यात मराठा, शीख, मुस्लीम, गडवाल, जाट यांची संयुक्त बटालियन करण्यात आली. यात सीताराम पाटील हेदेखील सहभागी होते. श्रीलंकेतील शांतीसेनेच्या कामगिरीत 21 ऑक्टोबर 1987 ला त्यांना वीरगती प्राप्त झाली. भारत सरकारने 1988 ला त्यांच्या कुटुंबीयांना वीरचक्र देऊन गौरविण्यात आले. 1990 ला त्यावेळेस मुख्यमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.
1989 चे वर्ष. जाधेवाडी (ता. आजरा) येथील विठ्ठल कुरणकर यांच्या घरी तार आली. कुटुंब व गल्लीतील माणसे चिंताग्रस्त झाली. श्रीधर कुरणकर एलटीटीईच्या हल्ल्यात धारातीर्थी पडल्याची ती वार्ता होती. 1974 ला बेळगाव येथे झालेल्या सैन्यभरतीत त्यांची निवड झाली. तमिळ व सिंहली यांच्यातील वाद उफाळल्याने भारत सरकारने श्रीलंकेत शांती सेना पाठविली. 8 जुलै 1989 रोजी भारतीय सैन्याची तुकडी जंगलात पेट्रोलिंगला गेली. श्रीधर हे कर्नल यांच्यासमवेत वाहनात होते. अचानक अतिरेक्यांनी हल्ला केला. बॉम्ब फेकले. श्रीधर यांनी वाहनातून उतरून अतिरेक्यांचा शोध घेतला. वाहनाखाली लपून बसलेल्या एका अतिरेक्याने त्यांच्या चेहर्यावर गोळीबार केला. यात कुरणकर शहीद झाले. 1990 ला त्यांना मरणोत्तर वीरचक्रने सन्मानित करण्यात आले.
सुभेदार सुभाष बाबू डोंगरे सुळे (ता.आजरा) येथील आहेत. भारतीय सेनेत ते 1986 मध्ये भरती झाले. 1999 मध्ये कारगिल ऑपरेशनच्या विजयासाठी त्यांना पाठविण्यात आले. कारगिल युद्धाच्या 86 दिवसांपैकी 79 दिवस कारगिल मध्ये सक्रिय युद्धामध्ये ते सहभागी होते. त्यांना कारगिल युद्धासाठी विशेष असा कारगिल थिएटर ऑनर मिळाला आहे. ऑपरेशन पवन श्रीलंका 1987 ते 1989, भूतानमध्ये प्रशिक्षक म्हणून नियुक्ती 1990 ते 1992, ऑपरेशन ऑर्चिड नागालँड 1993 ते 1995, जम्मू-काश्मीर ऑपरेशन रक्षक 1997 ते 1999, ऑपरेशन विजय कारगिल 1999 मध्ये ते सहभागी होते. सध्या सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदावर कोल्हापूर येथे सेवा बजावत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 12 वीर जवानांनी सैन्य दलात अलौकिक शौर्य दाखवले आहे. त्यांना भारत सरकारने विविध पदके देऊन गौरवले आहे. यामध्ये शिवाजी पाटील (कीर्ती चक्र), श्रीधर कुरणकर (वीर चक्र), सीताराम पाटील (वीर चक्र), लक्ष्मण औलकर (शौर्य चक्र), आप्पाजी कदम, भीमसेन बागडी, पांडुरंग दळवी, दुरदुंडी कंकणवाडी, उत्तम भिकले, राजेंद्र तुपारे, शंकर भाट ( सर्व सेना पदक), भाऊसाहेब पोवार (नौसेना मेडेल) यांचा समावेश आहे.