

माजी गृहमंत्री १०० कोटी वसूलीचा आरोप करून गायब झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आज (ता.२५) तब्बल २३४ दिवसांनी मुंबईत परतले. न्यायालयाने फरार घोषित करताच त्यांनी चंदिगडमध्ये असल्याची माहिती माध्यमांना दिली होती. त्यांची आज गुन्हे शाखेकडून तब्बल ७ तास कसून चौकशी करण्यात आली.
दरम्यान, परमबीर सिंग यांच्या वसूलीच्या आरोपांनी ठाकरे सरकारला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यामागे ईडीचा ससेमीरा लागला असून ते न्यायालयीने कोठडीत आहेत.
परमबीर सिंग यांनी आरोप करून दिल्यानंतर राज्यासह दिल्लीपर्यंत खळबळ उडाली. आरोप करून ते रजेवर निघून गेले आणि तेथून त्यांचा पत्ता लागेनासा झाला होता. दरम्यान, त्यांनी राज्यात परतून येत असताना ठाकरे सरकारला कोणतीही माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे ठाकरे सरकार त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा विचार करत आहे. याबाबत सुत्रांनी माहिती दिली असून एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, आज परमबीर सिंग मुंबईत परतल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. गुन्हे शाखेकडून त्यांची सात तास प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. या चौकशी दरम्यान परमबीर सिंग यांनी अनेक आरोप फेटाळून लावताना आपला काहीच संबंध नसल्याचे त्यांनी म्हटल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आले आहे. परमबीर सिंग यांनी प्रकट होण्यापूर्वी मुंबई पोलीसांकडून जीवाला धोका असल्याचा दावा केला होता.
सचिन वाझे प्रकरणानंतर परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले. त्यामुळे देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. तसेच त्यांना ईडीने अटकही केली. देशमुख सध्या कोठडीत असून परमबीर सिंग हे फरार होते.
त्यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून बिमल अग्रवाल या बिल्डरने दाखल केलेल्या तक्रारीबाबत त्यांची चौकशी सुरू आहे. यातील काही गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. या गुन्ह्यांमध्ये अपहरण, खंडणी, भ्रष्टाचार आणि ॲट्रॉसिटीचा समावेश आहे. याबाबत मुंबई आणि ठाण्यातील न्यायालयांनी सिंग यांना फरार घोषित केले होते. तसेच त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू होती.
परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले आहेत. याप्रकरणी ६ डिसेंबरला पुढील सुनावणी घेण्यात येईल. सुनावणी दरम्यान परमबीर सिंह हे भारतातच आहेत अशी माहिती त्यांचे वकिल पुनीत बाली यांनी न्यायमूर्ती एसके कौल यांच्या खंडपीठाला दिली. तपास सीबीआयकडे सोपवल्यास ४८ तासांमध्ये सिंह हे सीबीआय समक्ष हजर होतील, अशी माहिती देखील बाली यांच्याकडून खंडपीठाला देण्यात आली.
हे ही वाचलं का ?