दगाफटका टाळण्याचे श्रीरंग बारणेंसमोर आव्हान!

दगाफटका टाळण्याचे श्रीरंग बारणेंसमोर आव्हान!

Published on

मावळात सलग दोन टर्म खासदार असणारे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने कडवे आव्हान उभे केल्याने दगाफटका टाळण्यासाठी मित्रपक्षांना मनविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र, मित्रपक्षाचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात मनापासून उतरले नसल्याची चर्चा आहे.

विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असूनही बारणे यांच्या उमेदवारीस विरोध झाला होता. अंतिम टप्प्यात त्यांची उमेदवारी जाहीर झाली, मात्र मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादीने त्यांना टोकाचा विरोध केला. बारणे यांना उमेदवारी मिळाल्यास प्रचार न करण्याची भूमिकाही काही स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी घेतली होती. अंतर्गत विरोध चव्हाट्यावर आल्याने त्यांच्या एकतर्फी विजयाच्या आत्मविश्वासाला ब्रेक लागला.

उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाल्याने प्रचारास कमी कालावधी मिळाला असतानाच मित्रपक्षांचा रूसवा काढण्यातच त्यांना वेळ द्यावा लागला. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी भेटीगाठी घेऊन विरोध मावळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. मात्र, एवढे करूनही मित्रपक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्ते मनापासून प्रचार करताना दिसत नाहीत.

बारणे यांनी खासदार म्हणून मतदार संघात काय कामे केली, याचा हिशेब देण्याचे आव्हान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले होते. बारणे यांच्या कामाचा विरोधकांनी प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. मतदार संघात नव्हे कार्यकर्त्यांचीही त्यांनी कामे केली नसल्याने त्यांच्याकडे स्वत:च्या कार्यकर्त्यांची फळीही नसल्याची टीका विरोधक करीत आहेत.

सभांचा धुरळा निकाली ठरणार

महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह स्टार प्रचारकांच्या सभा होत आहेत. तर त्यांचे विरोधक शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार व इतर नेत्यांच्या सभा होणार आहेत. या सभा उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news