

लंडन; वृत्तसंस्था : ‘ओव्हल’वर सुरू असलेल्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले आहे. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या भेदक मार्यापुढे इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे यजमान इंग्लंडला केवळ 23 धावांची नाममात्र आघाडी मिळाली. सिराज आणि कृष्णाने प्रत्येकी 4 बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यानंतर भारताने दुसर्या डावात दिवसअखेरीस 2 बाद 75 धावा केल्या होत्या. सलामीवीर यशस्वी जैस्वालने अर्धशतक पूर्ण केले. तो 51, तर नाईट वॉचमन आकाश दीप 4 धावांवर नाबाद होते. के.एल. राहुल (7) आणि साई सुदर्शन (11) हे बाद झाले. भारताकडे आता 52 धावांची आघाडी आहे.
शुक्रवारी दुसर्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली, तेव्हा भारताचा डाव 224 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला होता. मात्र, दुपारच्या सत्रात सिराजने सामन्याचे चित्रच पालटले. त्याने धोकादायक सलामीवीर झॅक क्रॉऊली (64), कर्णधार ऑली पोप (22) आणि इंग्लंडचा प्रमुख फलंदाज जो रूट (29) यांना माघारी धाडत भारताला सामन्यात परत आणले. सिराजने आपल्या भेदक इनस्विंग यॉर्करवर जेकब बेथेललाही पायचीत पकडले.
एकीकडे सिराज विकेट घेत असताना, दुसरीकडे प्रसिद्ध कृष्णानेही टिच्चून गोलंदाजी केली. त्यानेही इंग्लंडच्या मधल्या फळीला खिंडार पाडले. या सत्रात कृष्णा आणि जो रूट यांच्यात शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली, ज्यामुळे मैदानातील वातावरण तापले होते. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 53 धावांची झुंजार खेळी केली; पण तो संघाला मोठी आघाडी मिळवून देऊ शकला नाही. सिराजने बू्रकचा त्रिफळा उडवून इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. आकाश दीपला बेन डकेटच्या रूपाने एक बळी मिळाला. भारताने पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला केवळ 23 धावांची आघाडी मिळाली.
लंडन येथील ओव्हलच्या मैदानातील इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव 224 धावांत आटोपला. करुण नायर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 6 बाद 204 धावांवरून दुसर्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली; पण खेळाला सुरुवात झाल्यावर जॉश टंग याने करुण नायरच्या खेळीला 57 धावांवर ब्रेक लावला. त्यानंतर गस अॅटकिन्सन याने उर्वरित 3 विकेटस् घेत टीम इंडियाचा पहिला डाव तासभराच्या आतच आटोपला. दुसर्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर भारतीय संघाने अवघ्या 20 धावांत 4 विकेटस् गमावल्या.
भारतीय संघाकडून करुण नायरने अर्धशतकी खेळीसह सर्वाधिक धावा केल्या. त्याने 109 चेंडूंचा सामना करताना 57 धावांची खेळी केली. यात 8 चौकारांचा समावेश होता. साई सुदर्शन याने 108 चेंडूंचा सामना करताना 38 धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय वॉशिंग्टन सुंदर 26 (55), ध्रुव ज्युरेल 19 (40), शुभमन गिल 21 (35) धावांची खेळी केली.
इंग्लंडच्या ताफ्यातून गस अॅटकिन्सन याने दमदार कमबॅक करताना वॉशिंग्टनसह तळाच्या फलंदाजीतील तिघांना आऊट करत पाच विकेटस्चा डाव साधला. त्याच्याशिवाय जॉश टंगन 3, तर क्रिस वोक्सने एक विकेट घेतली.