

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आगामी महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) साठी गुरुवारी होणार्या लिलावात जगभरातील 277 खेळाडू 73 जागांसाठी आपले नशीब आजमावतील. यात भारताची विश्वचषक स्टार दीप्ती शर्मा हिचाही समावेश आहे.
आगामी लिलावासाठी एकूण 19 खेळाडूंनी सर्वाधिक 50 लाख रुपये मूळ किमतीच्या गटात तर 40 लाख रुपयांच्या गटात 11 खेळाडू आणि 30 लाख रुपयांच्या गटात 88 खेळाडूंनी नोंदणी केली आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली. प्रसिद्धीपत्रकानुसार, लिलावात 194 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. यात 52 ‘कॅप’ खेळाडू (राष्ट्रीय संघाकडून खेळलेले) आणि 142 ‘अनकॅप’ खेळाडू (राष्ट्रीय संघाकडून न खेळलेले) आहेत. हे खेळाडू 50 जागांसाठी बोली लावण्यासाठी उपलब्ध असतील. याशिवाय, 66 परदेशी ‘कॅप’ आणि 17 परदेशी ‘अनकॅप’ खेळाडू 23 उपलब्ध जागा भरण्यासाठी रिंगणात असतील.
भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा, हरलीन देओल, प्रतीका रावळ, पूजा वस्त्रकार, उमा छेत्री आणि क्रांती गौड यांचा समावेश सर्वाधिक 50 लाख रुपयांच्या मूळ किमतीच्या गटात आहे. निवडलेल्या पाच फ्रँचायझींना जास्तीत जास्त 18 खेळाडूंचा संघ तयार करण्याची मुभा आहे. या लिलावापूर्वी, फ्रँचायझींनी एकूण 17 खेळाडूंना (सात परदेशी खेळाडूंसह) संघात कायम ठेवले आहे. पाचही संघांकडे लिलावासाठी एकत्रितपणे 41.1 कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध आहे. हा लिलाव 8 खेळाडूंचा समावेश असलेल्या ‘मार्की सेट’ने सुरू होईल. यात दीप्ती शर्मा, वेगवान गोलंदाज रेणुका सिंग, सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड), सोफी एक्लेस्टन (इंग्लंड), अॅलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), एमिलिया केर (न्यूझीलंड), मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया) आणि लॉरा वोल्व्हार्ड (दक्षिण आफ्रिका) यांचा समावेश आहे.