

नवी मुंबई; वृत्तसंस्था : वुमन्स प्रीमियर लीग 2026 (डब्ल्यूबीएल) मधील आठव्या सामन्यात गुरुवारी यूपी वॉरियर्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव केला. सलग तीन पराभवांनंतर यूपीने या स्पर्धेतील आपला विजयाचा श्रीगणेशा केला, तर मुंबईची विजयाची हॅट्ट्रिक थोडक्यात हुकली.
नॅट सायव्हर-ब्रंटचे झुंजार अर्धशतक
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात संथ झाली. अमनजोत कौरने 38 धावांचे योगदान दिले, तर कर्णधार हरमनप्रीत कौर (16) स्वस्तात बाद झाली. मात्र, नॅट सायव्हर-ब्रंटने एकाकी झुंज देत 43 चेंडूंत 9 चौकार आणि 1 षटकारासह 65 धावा कुटल्या. निकोला केरीने (नाबाद 32) तिला चांगली साथ दिली, ज्यामुळे मुंबईने 20 षटकांत 5 बाद 161 धावांपर्यंत मजल मारली.
हरलीन देओलचा ‘वन मॅन’ शो
162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सने दमदार सुरुवात केली. मेग लॅनिंग (25) आणि फोबी लिचफिल्ड (25) यांनी धावसंख्या शंभरी पार नेली. मात्र, सामन्याचे खरे आकर्षण ठरली ती हरलीन देओल. हरलीनने केवळ 39 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 64 धावांची आक्रमक खेळी केली. तिला क्लो ट्रायॉनने (नाबाद 27) सुरेख साथ दिली. यूपीने हे लक्ष्य 18.1 षटकांतच 3 गडी गमावून पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स महिला संघ 20 षटकांत 5 बाद 161(नॅट सायव्हर-ब्रंट 65, अमनज्योत 38; दीप्ती शर्मा 31/1)
यूपी वॉरियर्स महिला संघ : 18.3 षटकांत 3 बाद 162/3 (हरलीन देओल नाबाद 64, क्लो ट्रायॉन नाबाद 27 ; नॅट सायव्हर-ब्रंट 28/2)