

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जागतिक अॅथलेटिक्स परिषदेने महिला गटातील पात्रता निकषांमध्ये मोठा बदल करत ‘एसआरवाय (सेक्स डिटरमायनिंग रिजन वाय) जीन’ चाचणी बंधनकारक केली आहे. ही नवीन अट 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार असून, टोकियो येथे 13 सप्टेंबरपासून सुरू होणार्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी ही चाचणी आवश्यक असेल.
महिला गटात सहभागी होऊ इच्छिणार्या सर्व खेळाडूंना एकदाच केली जाणारी ‘एसआयवाय जीन’ चाचणी पार पाडावी लागणार आहे. ही चाचणी गालातील स्वॅबद्वारे किंवा रक्त तपासणीद्वारे केली जाईल. संबंधित देशांच्या सदस्य संघटना या प्रक्रियेचे नियंत्रण करतील.
जागतिक अॅथलेटिक्सचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी म्हटले की, महिलांच्या क्रीडाक्षेत्रातील प्रामाणिकपणा व संधीची समता राखणे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जैविकद़ृष्ट्या स्त्री असलेल्या खेळाडूंनाच महिला गटात सहभागी होता यावे, यासाठीच ही पावले उचलली जात आहेत. नवीन नियमानुसार, लिंग ओळख नाकारण्यात येत नाही. मात्र, स्पर्धात्मक पातळीवर जैविक लिंगाला महत्त्व दिले जाणार आहे. संघटना व्यक्तीच्या गोपनीयतेचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करेल आणि कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेचे बंधन ठेवले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
* वर्ल्ड अॅथलेटिक्सने स्पष्ट केले आहे की, या नियमांची अंमलबजावणी करताना खेळाडूंच्या वैयक्तिक बाबींची पूर्ण काळजी घेतली जाईल. याशिवाय, यासंदर्भात कार्यवाही करताना खालील मुद्द्यांची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी जारी केले आहेत.
* संस्था कोणत्याही खेळाडूच्या जेंडर आयडेंटिफेकशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही.
* खेळाडूंच्या सन्मानाचा आणि गोपनीयतेचा पूर्ण आदर केला जाईल.
* खेळाडूंच्या माहितीची गोपनीयता काटेकोरपणे पाळली जाईल.
* कोणत्याही खेळाडूवर शस्त्रक्रिया करण्याची सक्ती केली जाणार नाही.