पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकत्याच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) याने पुन्हा एकदा आपली प्रतिभा दाखवली. त्याने या कसोटी मालिकेतील चार डावांमध्ये १८९ धावा केल्या असून, यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. सध्या २०२४ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत तो तिसर्या स्थानावर आहे. जाणून घेवूया यावर्षी कसोटीतील सर्वाधिक धावा करण्यासाठी त्याच्यासमोर असणार्या आव्हानांबाबत...
यशस्वी जैस्वालने कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. या लक्षवेधी कामगिरीमुळे एका वर्षात देशांतर्गत कसोटीत सर्वाधिक अर्धशतके करणारा तो फलंदाज बनला आहे. त्याने घराच्या मैदानावर खेळताना ८ अर्धशतकी खेळी केल्या आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांनी १९७९ मध्ये एका वर्षात ७ अर्धशतके झळकावली होती. सेहवाग, पुजारा आणि राहुल यांनीही प्रत्येकी ७ अर्धशतके केली आहेत. आता हा विक्रम यशस्वी जैस्वालने मोडला आहे.
या वर्षीचा विचार करता आतापर्यंत यशस्वी जैस्वालने 66.35 च्या सरासरीने 929 धावा केल्या आहेत.त्याचा स्ट्राइक रेट देखील ८० पेक्षा अधिक आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने सर्वाधिक धावा केल्या. वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याने २६६ धावा केल्या होत्या; पण दक्षिण आफ्रिकेत त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र बांगलादेशविरुद्ध त्याने दमदार कमबॅक केले.
भारताला उर्वरित तीन महिन्यांत ७ कसोटी सामने खेळणार आहे. 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. तर २२ नोव्हेंबरपासून टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच कसोटी सामने खेळेल. या वर्षीच्या अखेरपर्यंत या मालिकेतील चार सामने संपलेले असतील. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील पाचवी कसोटी पुढील वर्षी ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. 2024 मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सध्या श्रीलंकेचा क्रिकेटर कमिंडू मेंडिस दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 26 डावात 94.30 च्या सरासरीने 943 धावा केल्या आहेत. मात्र श्रीलंका या वर्षी केवळ दोनच कसोटी सामने खेळणे बाकी आहे.
2024 मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत यशस्वी जयस्वाल सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट अव्वल स्थानावर आहे. रुट याने आतापर्यंत १५ कसोटी डावांमध्ये 66.35 च्या सरासरीने तब्बल ९२९ धावा केल्या आहेत. इंग्लंडला चालू वर्षात आणखी फक्त 6 कसोटी खेळायच्या आहेत. ७ ऑक्टोबरपासून इंग्लंडचा पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सामना होणार आहे. त्यानंतर इंग्लंडचा संघ २८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. रूटचा फॉर्म पाहता यशस्वीला आपल्या फलंदाजीमध्ये लक्षणीय सातत्य ठेवावे लागणार आहे.