

दुबई (वृत्तसंस्था) : मिनी वर्ल्डकप समजल्या जाणार्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज (दि. 9) सामना रंगणार आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानावर हा महासंग्राम रंगणार आहे. एकीकडे दुबईच्या मैदानावर सलग 4 सामने जिंकणारा भारतीय संघ आहे, तर दुसरीकडे याच मैदानावर भारताकडून पराभव स्वीकारलेला न्यूझीलंड संघ आहे. हायब्रीड मॉडेलमुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवण्याचा आयसीसीने निर्णय घेतला. स्पर्धेत सर्वात आधी भारताने बांगला देशवर सहज विजय मिळवला. त्यानंतर यजमान पाकिस्तानला भारताने पराभवाची धूळ चारली. साखळी सामन्यातील अंतिम फेरीत भारताने न्यूझीलंडला पराभूत केले होते आणि सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. आता भारतीय संघ स्पर्धेत दुसर्यांदा न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे.
दुखापतीमुळे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री अंतिम सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. भारताचा विराट कोहलीही सरावात जखमी झाल्याचे वृत्त आहे, पण तो फायनलमध्ये खेळणार असल्याचे खात्रीलायकरीत्या कळते आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ज्याने ‘अ’ गटातील लढतीत भारताविरुद्ध 5 विकेटस् घेतल्या होत्या, त्याच्या फायनल खेळण्यावर साशंकता निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत मॅट हेन्री याचा खांदा दुखावला गेला होता. झेल घेताना तो खांद्यावर आपटला आणि त्याच्या दुखापतीबाबत अद्याप अपडेटस् नाहीत, तर मीडिया रिपोर्टनुसार हेन्री फायनलच्या सामन्याला मुकणार असल्याचे सांगितले जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम साखळी सामन्यात भारतीय प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल झाला होता. वेगवान गोलंदाज हर्षित राणाला वगळून फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली आणि वरुणने त्या सामन्यात 5 विकेटस् घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलच्या सामन्यात हीच प्लेईंग इलेव्हन कायम ठेवण्यात आली होती. त्यामुळे अंतिम सामन्यातही हीच प्लेईंग इलेव्हन कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान : हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी दुपारी 2.30 वाजता सुरू होणार्या या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता नाही. तर सामन्याच्या मध्यंतरापर्यंत साधारणत: 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असेल. तर जसजसा सूर्य मावळतीला जाईल तसे तापमान कमी होईल व रात्री साधारणत: 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे.
पीच रिपोर्ट : दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावरील खेळपट्टी ही संथ आहे. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत होते व त्यांना सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेटस् मिळू शकतात, पण जसजसा सामना पुढे जाईल तशी खेळपट्टी संथ होते. ज्यामुळे फिरकीपटूंना विकेटस् घेण्याची संधी निर्माण होते.
विल्यमसन वि. फिरकी
न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन हा फिरकीविरुद्ध चांगली फलंदाजी करीत असल्यामुळे भारताला त्याच्यापासून सावध राहावे लागेल. त्याला जितके लवकर बाद करता येईल तितके भारतासाठी चांगले राहील. साखळी सामन्यात विल्यमसनने भारताविरुद्ध 81 धावांची खेळी केली होती.
कुलदीप यादव : भारताचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याच्यासमोर विल्यमसनचे रेकॉर्ड फारसे चांगले नाही. हे दोघे आतापर्यंत 5 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यापैकी 2 वेळा कुलदीपने त्याला बाद केले आहे. कुलदीपच्या गोलंदाजीवर त्याने आतापर्यंत 54 धावा केल्या आहेत.
अक्षर पटेल : विल्यमसन वि. अक्षर पटेल असा सामना 5 वेळा रंगला आहे. यापैकी 2 वेळा तो अक्षरची शिकार झाला. त्याने अक्षरविरुद्ध 78 धावा केल्या आहेत. गेल्या सामन्यात अक्षरनेच त्याचा अडथळा दूर केला होता. अंतिम सामन्यात विल्यमसनसला थांबवण्याची जबाबदारी अक्षर पटेलवरच असेल.
न्यूझीलंडची आयसीसी टूर्नामेंटमध्ये कामगिरी चांगली आहे. 2007 पासून 2023 पर्यंत न्यूझीलंड संघाने प्रत्येक वेळी वन डे वर्ल्डकपचा सेमीफायनल किंवा फायनलचा सामना खेळला आहे.
मर्यादित षटकांच्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना 16 वेळा झाला. यामध्ये 6 वेळा भारतीय संघाचा विजय झाला, तर 9 वेळा न्यूझीलंडचा विजय झाला. दोन्ही संघांमधील एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
आज न्यूझीलंड संघ तिसर्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे. पण, भारताकडे अंतिम सामना खेळण्याचा जास्त अनुभव आहे. भारतीय संघ पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये उतरणार आहे.
गेल्या सहा वर्षांत 2 वेळा भारत आणि न्यूझीलंडमध्ये आयसीसी वन डे वर्ल्डकप सेमीफायनलचा सामना झाला आहे. 2019 मध्ये मॅट हेन्रीने भारताला अंतिम सामन्यात जाण्यापासून रोखले होते, तर 2023 च्या वन डे वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारताने 70 धावांनी विजय मिळवत जुना हिशेब चुकता केला होता.
श्रेयस अय्यर
भारतीय क्रिकेट टीमच्या मिडल ऑर्डर फलंदाज श्रेयस अय्यर शानदार फॉर्ममध्ये आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत अय्यरचा बॅट आग ओकत आहे. अय्यरने टीम इंडियासाठी या टूर्नामेंटमध्ये 4 सामन्यांत 195 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध लीग स्टेजमध्ये त्यांनी 79 धावांची सर्वोच्च खेळी केली होती. विशेषतः किवी टीमच्या समोर अय्यर प्रभावी कामगिरी करतो. अशा परिस्थितीत, अंतिम सामन्यातही त्यांनी टीम इंडियासाठी धमाल करावी, अशी भारतीयांना आशा आहे.
विराट कोहली
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये विराट कोहलीची बॅट जोरात चालली आहे. कोहलीने टीम इंडियासाठी या स्पर्धेत आतापर्यंत चार सामन्यांत 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 217 धावा केल्या आहेत. विराट कोहली ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे, त्यानुसार दुबईतील मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात एक तुफान येणार आहे. जर असे झाले तर टीम इंडिया चॅम्पियन बनण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. कोहलीच्या फॉर्ममुळे भारताला विजय मिळवण्यात मोठा फायदा होईल आणि त्यांच्या प्रदर्शनाने अंतिम सामन्यात निर्णायक भूमिका बजावली जाईल.
हार्दिक पंड्या
टीम इंडियासाठी हार्दिक पंड्याचा शानदार फॉर्म एक मोठा सकारात्मक मुद्दा आहे. हार्दिकने या टूर्नामेंटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध जर हार्दिक आपल्या रंगात आला, तर भारतीय टीमसाठी सामना जिंकणे सोपे होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक पंड्याने 81 धावा केल्या आहेत आणि तसेच 4 विकेटस्ही घेतल्या आहेत. त्यांच्या ऑलराऊंड प्रदर्शनामुळे टीमला मजबुती मिळते आणि अंतिम सामन्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. जर हार्दिक असेच प्रदर्शन करत राहिला, तर भारताला चॅम्पियन बनण्याच्या दिशेने मोठे प्रोत्साहन मिळेल.
वरुण चक्रवर्ती
टीम इंडियासाठी स्पिन गोलंदाज वरुण चक्रवर्ती न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एक्स-फॅक्टर म्हणून सिद्ध होऊ शकतो. वरुणने आपल्या फिरकीने किवी फलंदाजांसाठी डोकेदुखी निर्माण केली आहे. या टूर्नामेंटमध्ये वरुणला फक्त 2 सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये त्याने 7 विकेटस् घेतल्या आहेत. त्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे भारतीय संघाला मोठा फायदा होऊ शकतो आणि जर त्याने अंतिम सामन्यातही अशीच कामगिरी केली तर भारताचा विजय नक्की आहे.
अक्षर पटेल
टीम इंडियाचा फिरकी अष्टपैलू अक्षर पटेलने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत एक वेगळे रूप दाखवले आहे. अक्षर भारतीय टीमसाठी या टूर्नामेंटमध्ये बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग या तिन्ही विभागात चमकतो आहे. त्याला सातत्याने 5व्या नंबरवर बॅटिंग करण्याची संधी मिळत आहे, ज्या ठिकाणी त्याने 80 धावा केल्या आहेत आणि याबरोबरच बॉलिंगमध्ये 5 विकेटस्देखील घेतल्या आहेत. त्यांच्या ऑलराऊंड क्षमतामुळे टीमला मजबूत आधार मिळाला आहे आणि अक्षरचा हा फॉर्म अंतिम सामन्यातही महत्त्वाची ठरू शकतोे. जर तो असाच प्रदर्शन करत राहिला, तर भारतीय संघाच्या यशाची शक्यता वाढते.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.
मिचेल सँटेनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरी मिचेल, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मॅट हेन्री/जेकब डफी, कायल जेमिन्सन, विल्यम ओ’रुर्क.