टी-२० चा खरा थरार! शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज... आणि होल्डरने ठोकला चौकार
फ्लोरिडा; वृत्तसंस्था : अष्टपैलू जेसन होल्डरने फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर केलेल्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्धच्या दुसर्या टी-20 सामन्यात शेवटच्या चेंडूवर दोन गडी राखून सनसनाटी विजय मिळवला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. सलग सात टी-20 सामन्यांतील पराभवाची मालिकाही विंडीजने या विजयाने खंडित केली.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 133 धावाच करू शकला. पाकिस्तानकडून हसन नवाजने सर्वाधिक 40 धावा केल्या, तर कर्णधार सलमान आगाने 38 धावांचे योगदान दिले. विंडीजकडून जेसन होल्डरने भेदक मारा करत केवळ 19 धावांत 4 महत्त्वपूर्ण बळी घेतले.
134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात अडखळत झाली. पाकिस्तानचा फिरकीपटू मोहम्मद नवाजने (3/14) विंडीजच्या फलंदाजांना जखडून ठेवले. एका क्षणी विंडीजची अवस्था 5 बाद 70 अशी झाली होती. मात्र, गुडाकेश मोती (28) आणि रोमारिओ शेफर्ड (15) यांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी करून संघाला सामन्यात परत आणले. शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांची गरज असताना शाहीन आफ्रिदीने दुसर्याच चेंडूवर शेफर्डला बाद केले. सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला असताना, शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती. यावेळी जेसन होल्डरने चौकार ठोकत संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना सोमवारी पहाटे याच मैदानावर खेळवला जाणार आहे.

