Ind vs Eng test | कुलदीपची उणीव भासेल?

Kuldeep Yadav
कुलदीप यादवPudhari File Photo
Published on
Updated on

निमिष पाटगावकर

मँचेस्टरला सकाळी आकाशात ढगांची गर्दी होती, पण भारतासाठी या मालिकेत टिकून राहणार्‍या या सामन्याला पावसाचे सावट नव्हते. भारताचा संघ या सामन्यासाठी काय असेल याची उत्सुकता नाणेफेकीपर्यंत कायम होती. गेले दोन दिवस सर्व सत्रात अंशुल कंभोजने केलेल्या सरावावरून त्याची निवड आकाशदीपच्या जागी होणार हे जवळपास नक्की होते. त्याचप्रमाणे साई सुदर्शनने अपेक्षेप्रमाणे करुण नायरची जागा घेतली. चौथा जलदगती गोलंदाज का तिसरा फिरकी गोलंदाज यात आपले अष्टपैलू प्रेम कायम राहिले आणि शार्दूल ठाकूरची वर्णी लागत कुलदीप पुन्हा संघात स्थान मिळवू शकला नाही. माझ्या मते ओल्ड ट्रॅफर्डला कुलदीप संघात असणे नक्कीच फायद्याचे ठरले असते. 2011 - 12 च्या या मैदानाच्या नूतनीकरणात मैदानाचा अक्ष पूर्व - पश्चिम बदलून उत्तर - दक्षिण करण्यात आला. या बदलामुळे इथल्या खेळपट्टीतला पूर्वीचा बाऊन्स कमी झाला आहे. त्याचप्रमाणे सामना पुढे जाईल तसे इथल्या निर्जीव खेळपट्टीवर मनगटी फिरकीपटूला इथे यश मिळण्याची शक्यता जास्त असते. शार्दूल ठाकूर हा फलंदाजी करू शकणारा गोलंदाज या अष्टपैलूच्या व्याख्येत बसतो. त्याची मध्यमगती गोलंदाजी किती उपयुक्त ठरते का, कुलदीपची उणीव भासते हे आपल्याला चौथ्या दिवशी कळून येईल.

शुभमन गिलने सलग चौथ्यांदा या मालिकेत नाणेफेक हरली आणि भारताने सलग 14 व्यांदा नाणेफेक हरायचा एक विक्रमच केला. या मैदानावर आतापर्यंत कुणी कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या संघाने सामना जिंकलेला नाही. हा इतिहास असून बेन स्टोक्सने भारताला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे सामन्याच्या दोन दिवस आधीपर्यंत खेळपट्टीवर असलेले गवत जरी पूर्ण छाटले असले तरी इथे झालेल्या पावसाने खेळपट्टीत दमटपणा असण्याची शक्यता होती. अशा खेळपट्टीचा आणि ढगाळ हवामानाचा फायदा आपल्या जलदगती गोलंदाजांना मिळावा म्हणून इतिहासाच्या विरुद्ध जात बेन स्टोक्सने क्षेत्ररक्षण स्वीकारले असेल किंवा लॉर्डस्ला बॅझबॉल गुंडाळून ठेवले असले तरी पुन्हा बॅझबॉल संस्कृतीचा अवलंब करीत चौथ्या डावात लक्ष्य गाठायचा त्याचा मनसुबा असावा. कधीकधी नाणेफेक हरणे सोयीचे असते, कारण अशा हवामानात आणि खेळपट्टीच्या बदलणार्‍या स्वरूपात निर्णय घेऊन तो बरोबर आहे हे सिद्ध करण्यापेक्षा नशिबात आलेल्या निर्णयाला सामोरे जाऊन उत्तम कामगिरी करणे हे सोपे असते. त्यामुळे गिलला निर्णय घ्यायच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखेच वाटले असेल.

इंग्लंडने त्यांच्या संघात एकमेव बदल केला तो म्हणजे जायबंदी शोएब बशीरच्या ऐवजी लियाम डॉसनचा समावेश केला. क्रिकेटपटूंच्या आयुष्यात नियतीचा खेळ कसा असतो बघा. करुण नायरने चेन्नईच्या त्रिशतक मारलेल्या सामन्यात डॉसनने कसोटीत पदार्पण केले होते. त्यांनतर दोन कसोटी सामने खेळल्यानंतर त्याला वगळण्यात आले. आठ वर्षे तो कसोटी संघाबाहेर होता. त्याच्या हॅम्पशायर कौंटीसाठी उत्तम कामगिरी केल्यावर त्याला वयाच्या 35 व्या वर्षी पुन्हा कसोटीचे दरवाजे उघडले. करुण नायरची या मालिकेसाठी झालेली निवडही आठ वर्षांनी झाली होती. या सामन्यात नायर खेळला असता तर कदाचित एकाच मालिकेत आठ वर्षांनंतर पुनरागमन करणारे दोन्ही संघांत खेळाडू असल्याची ही एकमेव घटना घडली असती. भारताच्या सलामीवीर राहुल आणि जैस्वालने इंग्लंडचा मारा खेळून काढताना चेंडू सोडायचा संयम दाखवला. राहुलचा या मालिकेतील फॉर्म स्वप्नवत आहे आणि त्याच्या फ्रंटफूट आणि बॅकफूट खेळण्यात सहजता दिसून येत होती. त्याच्या स्टान्समधला बदलाने त्याची बॅट खाली यायच्या कोनात बदल झाला आणि त्याच्या बॅटमधून धावांची बरसात व्हायला लागली. जैस्वालला आखूड टप्प्याच्या चेंडूंवर इंग्लिश गोलंदाज सतावणार हे नक्की होते, पण या डावात जैस्वालने संयम दाखवत गोलंदाजांवर प्रतिहल्ला न करता चेंडू सोडण्याचा संयम दाखवला आणि आपली लॉर्डस्ची चूक दुरुस्त केली. जोफ्रा आर्चरचा वेग लॉर्डस्पेक्षा थोडा कमी होता आणि त्याला खेळून काढायला भारताच्या सलामीवीरांना विशेष अडचण येत नव्हती. ख्रिस वोक्सने आपल्या ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूने दोघांना सतावले, पण त्याला यश मिळाले नाही. ड्यूक चेंडूने या सामन्यात तरी त्रास दिला नाही आणि 15 षटके जुना झाल्यावरही चेंडू विशेष स्विंग होत नव्हता.

उपाहारापर्यंत भारताने सलामीवीर जोडी शाबूत ठेवत पहिले सत्र जिंकले. महत्त्वाच्या सामन्यात तंबूतील बाकीच्या खेळाडूंची मानसिक शांतता प्रस्थपित होण्यासाठी सलामीवीरांनी नवा चेंडू खेळून काढणे अपेक्षित होते. जैस्वाल आणि राहुलने हे काम चोख बजावत स्टोक्सला प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा फायदा मिळून दिला नाही. पहिले सत्र भारताने जिंकल्यावर मात्र उपाहारानंतर वोक्सने इंग्लडला यश दाखवले. खेळपट्टीच्या काही ठिकाणांवरून चेंडू अचानक जास्त उसळत आहे. राहुलचा अंदाज यामुळेच चुकला. आठ वर्षांनंतर पुनरागमन करणार्‍या डॉसनने आपली उपयुक्तता जैस्वालला बाद करताना दाखवली. मुंबईचा फलंदाज फ्रंटफूटवर फिरकीपटूला खेळताना चेंडूची रेषा चुकतो. हा अपवादानेच होणारा प्रमाद आहे. या दोन बळींनी इंग्लंडच्या जीवात जीव आला. या खेळपट्टीवर संयम दाखवला तर धावा जमवणे शक्य आहे आणि भारताला पहिल्या डावात जास्तीत जास्त धावा जोडणे गरजेचे आहे. सामना पुढे जाईल तशी खेळपट्टी अजून संथ होईल आणि इंग्लंडला चौथ्या डावात तिसर्‍या फिरकीपटूशिवाय लक्ष्य देण्यासाठी भारताला पहिल्या डावातील आघाडी महत्त्वाची आहे. शार्दूल ठाकूरला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. आपली निवड सार्थ ठरवण्याचे त्याच्यावर नक्कीच दडपण असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news