

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (आरसीबी) संघाचा कर्णधार होण्यासाठी विराट कोहली ( Virat Kohli ) सज्ज झाला आहे. याबाबत त्याने संघ व्यवस्थापनाशी चर्चा केली असल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.
आरसीबी संघाने आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. २०२२ ते २०२४ या काळात आरसीबीचे नेतृत्त्व फाफ डू प्लेसिसने केले. तो ४० वर्षांचा आहे. त्याच्या वयाचा विचार करता संघ व्यवस्थापन आता पुन्हा एकदा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा विचार करत आहेत. विराटने २०१३ ते २०२१ या कालावधीत आरसीबीचे नेतृत्त्व केले. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने चार वेळा प्लेऑफपर्यंत धडक मारली होती. तर २०१६ मध्ये अंतिम फेरीतही स्थान मिळवले होते. मात्र अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला होता.
विराट कोहलीने २०२१मध्ये भारतीय संघाचे टी-20 कर्णधारपद सोडले. यानंतर तो आरसीबीच्या कर्णधारपदावरुनही पायउतार झाला होता. तसेच आयपीएलमध्ये मी अखेरपर्यंत केवळ आरसीबीचा खेळाडू राहीन, असेही स्पष्ट केले होते. आता पुन्हा एकदा संघ व्यवस्थापन विराटकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.