

सँटा क्लारा; वृत्तसंस्था : यजमान अमेरिकेने फिफा विश्वचषक स्पर्धेत आपली धडाकेबाज कामगिरी कायम ठेवत बोस्निया-हर्जगोव्हिनाचा २-० असा पराभव केला. या विजयासह अमेरिकेने थेट अंतिम १६ (बाद फेरी) मध्ये धडक मारली. मात्र, या मोठ्या विजयानंतरही अमेरिकेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. संघाचा स्टार स्ट्रायकर फोलारिन बलोगन याला मिळालेल्या ‘रेड कार्ड’मुळे तो बेल्जियमविरुद्ध होणाऱ्या पुढील महत्त्वाच्या सामन्याला मुकणार आहे.
सँटा क्लारा येथील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पूर्वार्धाचा खेळ संपण्यापूर्वी फोलारिन बलोगनने अप्रतिम मैदानी गोल करत अमेरिकेला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात, ६२ व्या मिनिटाला बलोगनने बोस्नियाच्या तारिक मुहरेमोविचवर एक अतिशय धोकादायक टॅकल केले. बलोगनचे स्टडस् थेट मुहरेमोविचच्या पायाला लागले. सुरुवातीला मैदानावरील पंचांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, रिप्लेमध्ये बलोगनचे टॅकल गंभीर दुखापत करू शकणारे दिसल्याने पंचांनी त्याला थेट ‘रेड कार्ड’ दाखवून मैदानाबाहेर काढले.
बलोगन मैदानाबाहेर गेल्याने अमेरिकेला उर्वरित सामना १० खेळाडूंसह खेळावा लागला. मात्र, यानंतरही त्यांनी बोस्नियाला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. ८० व्या मिनिटाला अमेरिकेला बॉक्सच्या अगदी बाहेर फ्री-किक मिळाली. मलिक टिलमनने मारलेली ही फ्री-किक बोस्नियाच्या बचावपटूंना चकवून थेट गोलपोस्टच्या कोपऱ्यात शिरली. या २-० च्या आघाडीसह अमेरिकेने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले.