

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रख्यात बॉक्सर माइक टायसनने जेक पॉल विरुद्धच्या लढाईनंतर मागील काही महिन्यापूर्वीच्या त्याच्या आरोग्य स्थितीबद्दलची माहिती उघड केली आहे. टायसन 20 जुलै रोजी पॉलशी लढण्यासाठी तयार होता. परंतु, 58 वर्षीय टायसन अल्सरच्या त्रासामुळे ही लढत पुढे ढकलण्यात आली होती. यावेळी बोलताना तो म्हणला की. "मला अल्सरचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मी कित्येक दिवस मरण यातना सहन केल्या. एकवेळी अशी होती की, आता माझ्या आयुष्याचा अंत होतो असे वाटत होते." टायसनने जेक पॉल विरुद्ध झालेल्या लढतीनंतर या गोष्टींची उघड माहिती त्याच्या 'एक्स' हँडलवर पोस्ट शेअर करत दिली आहे. (Mike Tyson)
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत टायसन म्हणाला, "ही अशी एक परिस्थिती आहे ज्यात मी सामना हरलो, पण तरीही जिंकलो. मी कालच्या रात्रीबद्दल आभारी आहे. रिंगमध्ये शेवटचा सामना खेळण्याचा कोणताही पश्चात्ताप मला नाही. जून महिन्यात मी मृत्यूच्या दारात होतो. मला 8 वेळा रक्तस्राव झाला. यामुळे शरीरातील निम्मे रक्त मी गमावले. या घटनेमुळे माझे हॉस्पिटलमध्ये 25 पौंड वजन कमी झाले. पुन्हा लढण्याइतपत फिट होण्यासाठी मला मृत्यूशी झुंज द्यावी लागली आणि शेवटी मी त्यातून बाहेर पडण्यामध्ये जिंकलो. माझ्या मुलांनी मला एका हुशार आणि माझ्या वयाच्या निम्म्या असलेल्या लढवय्याशी समोरासमोर उभं राहून 8 फेऱ्या पूर्ण करताना पाहिलं, आणि तेही भरगच्च डॅलस काऊबॉय स्टेडियममध्ये. अशा अनुभवाची मागणी करण्याचा हक्क कोणत्याही माणसाला नाही. धन्यवाद.