

लखनौ; वृत्तसंस्था : माजी विजेता किदाम्बी श्रीकांतने आणि गतविजेत्या महिला दुहेरीच्या जोडीतील त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद यांनी येथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी आणि महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
2016 मध्ये विजेतेपद पटकावलेल्या 32 वर्षीय श्रीकांतने 2023 चा राष्ट्रीय विजेता व आपलाच राष्ट्रीय सहकारी मिथुन मंजुनाथचे कडवे आव्हान 21-15, 19-21, 21-13 असे मोडीत काढत थरारक उपांत्य सामना जिंकला. या मोसमात मलेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत पोहोचलेला आणि 2021 विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा रौप्यपदक विजेता श्रीकांत आता अंतिम फेरीत हाँगकाँगच्या जेसन गुनावान व जपानच्या मिनोरू कोगा यांच्यातील जेत्याशी भिडणार आहे.
तत्पूर्वी, जागतिक क्रमवारीत 14 व्या स्थानी असलेल्या त्रिसा-गायत्रीने उत्कृष्ट खेळ साकारत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या ओंग शिन यी आणि कारमेन टिंग यांचा 21-11, 21-15 असा सहज पराभव केला. आता रविवारी होणार्या अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर जपानच्या आठव्या मानांकित काहो ओसावा आणि माई तनाबे यांचे आव्हान असेल.
दरम्यान, भारताचे महिला एकेरीतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. उन्मेश हुडा आणि तन्वी शर्मा या दोघींना सरळ गेममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. उन्मेशला तुर्कीच्या नेस्लिहान अरिनकडून 15-21, 10-21 ने तर माजी विश्वविजेती नोझोमी ओकुहारा हिला धक्का देणार्या तन्वीला जपानच्या हिना अकेचीकडून 17-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला.
यापूर्वी, हरिहरन आमसाकरुणन आणि त्रेसाच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला इंडोनेशियाच्या देजान फर्दिनस्याह आणि बर्नाडाईन अनिंद्या वरदाना यांच्याकडून 17-21, 19-21 अशा पराभवासह स्पर्धेबाहेर पडावे लागले. मंजुनाथने यापूर्वी दोनदा आंतरराष्ट्रीय स्तरावर माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या श्रीकांतला पराभूत केले होते. येथे मात्र श्रीकांतने आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळाच्या बळावर विजय खेचून आणला.