दुबई : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दहा दिग्गज खेळाडूंचा समावेश आयसीसी 'हॉल ऑफ फेम'मध्ये करणार आहे. त्यामुळे या प्रतिष्ठित यादीत सहभागी होणार्या क्रिकेटपटूंची संख्या 103 होणार आहे. क्रिकेटच्या या जागतिक संस्थेने 'हॉल ऑफ फेम'च्या विशेष संस्करणाची गुरुवारी घोषणा केली. त्यांनी पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या फायनलपूर्वी हा निर्णय घेतला आहे. डब्ल्यूटीसी फायनल भारत आणि न्यूझीलंडदरम्यान 18 जूनला साऊथहॅम्प्टन येथे खेळविण्यात येणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्या दहा दिग्गजांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.
आता या यादीत 93 खेळाडू आहेत. आयसीसीचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी ज्योफ अलारडाईस म्हणाले की, 'जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी दहा दिग्गज खेळाडूंचा समावेश हा हॉल ऑफ फेममध्ये करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यामध्ये क्रिकेटचा सुरुवातीचा काळ (1918 पूर्वी), दोन विश्वयुद्धादरम्यानचा काळ (1918-1945), युद्धाच्या नंतरचा काळ (1946-1970), एकदिवसीय क्रिकेटचा काळ (1971-1995) आणि आधुनिक क्रिकेटचा काळ (1996-2016) यांचा समावेश असेल. या खेळाडूंच्या नावाची घोषणा आयसीसी 13 जूनला करणार आहे.'