

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. चॅम्पियन गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah Injury) दुखापतीमुळे स्पर्धेतील काही सामने खेळू शकणार नाही. तो कदाचित ग्रुप स्टेज सामन्यांमधून बाहेर पडेल. जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीचा त्रास आहे. सिडनी येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या 5 व्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तो मैदानाबाहेर गेला आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्यासाठी आला नाही.
सिडनी येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती. यानंतर त्याला पाठदुखीची तक्रार होती, दरम्यान त्याचे स्कॅन करण्यात आले. तो सध्या बरा होत आहे. लवकरच त्याच्या पुनर्वसनासाठी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी दाखल होणार आहे. वृत्तसंस्था 'आजतक'ने दिलेल्या वृत्तानंतर बुमराह दुखापतग्रस्त असल्याने आणि त्याच्या पुनर्वसनासाठी एनसीएकडे तक्रार करणार आहे. यानंतर त्याच्या फिटनेसच्या जोरावर संघामध्ये त्याची निवड करण्यात येईल मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या निवडीबद्दल फारशी खात्री नाही. त्याच्या तंदुरुस्तीचा विचार करून, निवड समिती या संदर्भात अंतिम निर्णय घेईल.
बुमराहने 5 कसोटी सामन्यांच्या 9 डावात 13.06 च्या सरासरीने सर्वाधिक 32 बळी घेतल्या. त्याने 3 वेळा डावात 5 विकेट घेतल्या. दुखापतीमुळे तो सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. बुमराहनंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचा क्रमांक लागतो. त्याने 10 डावात 21.36 च्या सरासरीने 25 विकेट घेतल्या. स्कॉट बोलंडने 21 आणि मोहम्मद सिराजने 18 विकेट घेतल्या.