

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी 18 जानेवारी (शनिवार) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. पत्रकार परिषदेत तो उपस्थित होता. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी 'हायब्रिड मॉडेल' अंतर्गत पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. तर भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची रविवार (दि.12) ही शेवटची तारीख होती. मात्र बीसीसीआयने आयसीसीकडे वाढीव मुदतीची विनंती केली होती. या निवडीकडे सर्व भारतीय चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाच्या संघाच्या घोषणेकडे लागल्या होत्या. आता सर्व चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे कि, भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यासह स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे आगामी आयसीसी स्पर्धेत सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. त्यासोबतच टीममध्ये कोणाला संधी दिली आहे तर कोणाला वगळले आहे, ते पाहूया या बातमीमध्ये..
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह/हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.
संजू सॅमसन आणि मोहम्मद सिराज यांना संघातून वगळले आहे. गेल्या काही काळात सिराजने खूप गोलंदाजी केली आहे. यामुळे, त्याला विश्रांती देण्यात आली असावी. याशिवाय करुण नायर आणि नितीश रेड्डी यांनाही स्थान मिळालेले नाही. शमी एकदिवसीय सामन्यात परतला आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचेही 14 महिन्यांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. मागील काळामध्ये तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होता. मात्र दुखापतीनंतर त्याने राज्यांतर्गंत क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केल्याने त्याची संघात पुन्हा वर्णी लागली आहे.