

सामोकोव्ह/बल्गेरिया; वृत्तसंस्था : वडिलांचे कुस्तीपटू बनण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करत आणि आपल्या दिवंगत आजोबांना दिलेला शब्द पाळत, हरियाणाच्या 19 वर्षीय तपस्या गेहलोतने ज्युनिअर जागतिक कुस्ती स्पर्धेत (2025) सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. महिलांच्या 57 किलो वजनी गटात तिने मिळवलेले हे देदीप्यमान यश भारतासाठी या स्पर्धेतील पहिले सुवर्ण ठरले. अंतिम सामन्यात तिने नॉर्वेच्या फेलिसिटास डोमाजेवाचा पराभव केला; पण त्याआधी उपांत्य फेरीत सलग 40 आंतरराष्ट्रीय लढतींमध्ये अजिंक्य राहिलेल्या जपानच्या गतविजेत्या सोवाका उचिदाला धूळ चारून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तपस्यासाठी हा विजय केवळ शारीरिक कौशल्याचाच नव्हे, तर प्रचंड मानसिक धैर्याचाही होता. स्पर्धेसाठी दिल्लीतील राष्ट्रीय शिबिरात प्रशिक्षण घेत असतानाच, अवघ्या आठवडाभरापूर्वी तिच्या आजोबांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या दुःखद बातमीने खचलेल्या तपस्याने घरी परतावे का, असा विचार केला. मात्र, तिचे वडील प्रमेश गेहलोत यांनी तिला खंबीर राहण्यास सांगितले. तुझ्या आजोबांनी तुला शेवटचे काय सांगितले होते, हे लक्षात ठेव. विश्वविजेती म्हणूनच घरी परत ये, अशी त्यांची इच्छा होती, या वडिलांच्या शब्दांनी तपस्याला नवी ऊर्जा दिली आणि तिने शिबिरातच राहून आपले प्रशिक्षण सुरू ठेवले.
स्पर्धेत सुरुवातीच्या फेर्या सहज जिंकल्यानंतर, उपांत्य फेरीत तपस्यासमोर जपानच्या सोवाका उचिदाचे मोठे आव्हान होते. उचिदा केवळ गतविजेतीच नव्हती, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ती सलग 40 सामन्यांपासून अपराजित होती. या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या काही सेकंदात निर्णायक डाव टाकत तपस्याने 4-3 अशा फरकाने विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामना तुलनेने अधिक सरळ ठरला. नॉर्वेच्या फेलिसिटास डोमाजेवावर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत तपस्याने हा सामना 5-2 असा जिंकला आणि भारताच्या खात्यात पहिल्या सुवर्णपदकाची नोंद केली.
तपस्याचे वडील प्रमेश गेहलोत यांनी तपस्याचा जन्म झाला, त्यावेळी घरातील वातावरण कसे होते, याचा येथे आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ‘2006 मध्ये आमच्या पहिल्या अपत्याचा, तपस्याचा जन्म झाला, तेव्हा घरात आनंदाऐवजी नाराजीचे वातावरण होते. ‘लडकी हुई है’ (मुलगी झाली आहे) असे टोमणे ऐकू येत होते. सुरुवातीला आमची निराशा झाली. कारण, मुलगी झाल्याने आपले स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार नाही, असे वाटले होते. मात्र, आज आमच्या त्याच मुलीने केवळ स्वतःचेच नव्हे, तर आपल्या वडिलांचे आणि आजोबांचे स्वप्न साकारत देशाला गौरव मिळवून दिला आहे.’