

बठिंडा; वृत्तसंस्था : वय हे केवळ एक आकडा आहे, ही म्हण बठिंडा येथील अवघ्या आठ वर्षे, चार महिन्यांच्या तनिष्का गर्गने अक्षरशः खरी करून दाखवली आहे. आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या आणि अचूक चालींच्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) मानांकन मिळवले असून, ही कामगिरी करणारी ती पंजाबमधील महिला गटातील सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. गेल्या महिन्यात गुरुग्राम येथे झालेल्या 9 वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील तिच्या चमकदार कामगिरीमुळे तिला हे यश मिळाले. फिडेने ऑगस्ट महिन्यात अधिकृतपणे मानांकन जाहीर करताच तनिष्काच्या नावावर या ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली.
भावासोबत प्रशिक्षणाला जाताना लागली खेळाची गोडी
अवघ्या चौथ्या वर्षी केली सुरुवात
कुटुंबाचा पाठिंबा आणि कठोर मेहनत ठरली यशाची गुरुकिल्ली
यापूर्वी हा विक्रम नऊ वर्षांहून अधिक वय असलेल्या तन्वीर कौर खिंदाच्या नावावर होता. मात्र, तनिष्काने वयाच्या आठव्या वर्षीच हा टप्पा गाठून सर्वांना चकित केले आहे. तनिष्काचा बुद्धिबळाचा प्रवास तिच्या वयाच्या चौथ्या वर्षी सुरू झाला. तिची आई, मीनू गर्ग, सांगतात, आमचा मोठा मुलगा बुद्धिबळ प्रशिक्षक पंकज शर्मा यांच्याकडे शिकायला जात असे. तनिष्का अनेकदा त्याच्यासोबत फक्त एक सोबत म्हणून जायची. पटावरच्या सोंगट्यांची हालचाल, त्यातील डावपेच ती कुतूहलाने पाहत असे. तिची ही आवड प्रशिक्षक शर्मा यांच्या लक्षात आली आणि त्यांनी तिला खेळाचे प्राथमिक धडे दिले. सध्या तनिष्का प्रशिक्षक सौरभ अरोरा आणि दीपक बत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खेळाला अधिक धार देत आहे. तिचे वडील भूषण गर्ग आणि आई मीनू गर्ग तिच्या प्रत्येक गरजेकडे बारकाईने लक्ष देतात. तिच्या या प्रवासात बठिंडा येथील सिल्व्हर ओक्स स्कूलचेही मोठे सहकार्य लाभले आहे.
फिडे (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) रेटिंग मिळविण्यासाठी, खेळाडूला फिडे-रेटेड स्पर्धांमध्ये भाग घेणे आणि रेटेड प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विशिष्ट पातळीची कामगिरी साध्य करणे आवश्यक आहे. विशेषतः, एका अनरेटेड खेळाडूने अशा खेळाडूंविरुद्ध किमान पाच गेम खेळले पाहिजेत ज्यांच्याकडे आधीच फिडे रेटिंग आहे आणि त्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध किमान अर्धा गुण (एक बरोबरी किंवा विजय) मिळवला पाहिजे . सुरुवातीच्या रेटिंग गणनेत प्रतिस्पर्ध्यांचे सरासरी रेटिंग देखील भूमिका बजावते.