

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने (Steve Smith retirement) एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. मंगळवारी (दि. 4) दुबई येथे झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर दुसऱ्या दिवशी स्मिथने वनडे क्रिकेटला अलविदा करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघातील एक महत्वाचा खेळाडू असून, त्याने अनेक वर्षे संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या अप्रतिम फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला अनेक विजय मिळवून दिले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर स्मिथने आपल्या निवृत्तीची घोषणा करून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
स्टीव्ह स्मिथचे नाव ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांच्या श्रेणीमध्ये गणले जाते. त्याच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकल्यास तो क्रिकेटच्या इतिहासातील एक महान फलंदाज ठरतो. स्मिथने 169 वनडे सामने खेळले असून, त्यातील 153 डावांमध्ये 5727 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी 164 धावांची असून, त्याने 43.06 च्या सरासरीने आणि 87.13 च्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान त्याने 12 शतकं आणि 34 अर्धशतकं झळकावली असून, त्याच्या बॅटमधून 517 चौकार आणि 57 षटकार निघाले आहेत. स्मिथच्या या कामगिरीने ऑस्ट्रेलियाला अनेक निर्णायक विजय मिळवून दिले. त्याच्या संयमी आणि आक्रमक फलंदाजीच्या शैलीने तो चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करून गेला आहे.
स्मिथने 2010 साली वेस्ट इंडिजविरुद्ध लेग-स्पिन ऑलराउंडर म्हणून पदार्पण केले. मात्र यानंतर स्मिथने पुढे जाऊन आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. स्टीव्ह स्मिथचा शेवटचा वनडे सामना ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आणि त्यासह स्मिथच्या वनडे कारकिर्दीचा शेवट झाला. त्याने गोलंदाज म्हणूनही 28 विकेट्स घेतल्या, ज्यासाठी त्याचा सरासरी गोलंदाजी दर 34.67 होता. वनडे क्रिकेटला निरोप दिल्यानंतर आता त्याचा संपूर्ण फोकस कसोटी आणि टी-20 क्रिकेटवर असेल, अशी शक्यता आहे.
भारताविरुद्धच्या पराभवानंतर ३५ वर्षीय स्टीव्ह स्मिथने आपल्या सहकाऱ्यांना या निर्णयाची माहिती दिली. स्मिथ म्हणाला, "असे दिसते की आता निवृत्तीची योग्य वेळ आहे. हा एक अद्भुत प्रवास होता आणि मी त्यातील प्रत्येक मिनिटाचा आनंद घेतला. खूप छान क्षण आणि अद्भुत आठवणी आहेत. दोन विश्वचषक जिंकणे ही एक मोठी कामगिरी होती. तसेच अनेक अद्भुत सहकाऱ्यांनी या प्रवासात सहभाग घेतला. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करण्याची ही एक उत्तम संधी आहे, त्यामुळे हीच निवृत्तीची योग्य वेळ वाटते."