पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेने चट्टोग्राम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात आज (दि. ३१) बांगलादेशविरुद्ध विजय मिळवत मालिका २-० अशी जिंकली. या निर्णायक यशामुळे दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. ( South Africa WTC )आठपैकी चार विजयांसह या संघाच्या गुणांची टक्केवारी 54.17 इतकी झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेने चट्टोग्राम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एडन मार्कराम आणि टोनी डी झोर्झी यांनी ६९ धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर डी झॉर्झीने ट्रिस्टन स्टब्सच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी निर्णायक २०१ धावांची भागीदारी केली. या दोघांनीही कसोटी क्रिकेटमध्ये आपलं पहिले शतक नोंदवलं. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी डी झॉर्झीने १७७ धावांपर्र्यत मजल मारली. यानंतर विआन मुल्डरने दमदार १०५ धावांची खेळी केली. तो १०५ धावांवर नाबाद राहिला. डेव्हिड बेडिंगहॅम (59) तर सेनुरान मुथुसामी (68 धावांवर नाबाद राहिला) यांनी अर्धशतके केली. दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट्सवर 575 धावा करून डाव घोषित केला
फलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही भेदक मारा केला. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने पाच विकेट्स घेत यजमान बांगलादेशचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी अवघ्या 159 धावांत संपुष्टात आणला. महमूद हसन जॉय, मोमिनुल हक आणि तेजुल इस्लाम यांच्याशिवाय बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही. मोमिनुलने सर्वाधिक 82 धावा केल्या. कागिसो रबाडाने दक्षिण आफ्रिकेसाठी पहिल्या डावात सलामी दिली. डॅन पॅटरसन आणि केशव महाराज यांनी 2-2 विकेट घेतल्या. बांगलादेशवर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. पहिल्या डावात 159 धावांत सर्वबाद झाल्यानंतर बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 143 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात केशव महाराजने (keshav maharaj ) दक्षिण आफ्रिकेला पहिली विकेट मिळवून दिली. याशिवाय सेनुरान मुथुसामीने 4 बळी घेतले. डॅन पॅटरसनलाही यश मिळाले. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात हसन महमूदने सर्वाधिक नाबाद 38 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटीही एक डाव आणि २७३ धावांनी जिंकली.
बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेतील विजयामुळे आता आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण आफ्रिकेच्या गुणांची टक्केवारी (PCT) 47.62 वरून 54.17 झाली आहे. संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. बांगलादेश आठव्या स्थानावर असून अंतिम फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. भारतीय संघ सध्या ६२.८२ गुणांच्या टक्केवारीसह अव्वल तर ऑस्ट्रेलिया ६२.५० गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. 55.56 च्या गुणांसह तिसऱ्या स्थानावर श्रीलंका आणि 50.00 च्या गुणांसह पाचव्या स्थानावर न्यूझीलंड आहे.