

गेलेफू; वृत्तसंस्था : भूतानचा फिरकीपटू सोनम येशेने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात 8 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरून इतिहास रचला आहे. म्यानमारविरुद्ध खेळवल्या गेलेल्या तिसर्या टी-20 सामन्यात या डावखुर्या फिरकीपटूने ही अभूतपूर्व कामगिरी केली. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर कोणत्याही टी-20 क्रिकेट सामन्यात (डोमेस्टिक किंवा इतर) 8 बळी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
22 वर्षीय येशे याने 4 षटकांच्या आपल्या स्पेलमध्ये अवघ्या 7 धावा देऊन 8 बळी टिपले. भूतानने उभारलेल्या 127 धावांच्या प्रत्युत्तरात म्यानमारचा संघ 45 धावांवर गारद झाला. यापूर्वी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम मलेशियाच्या स्याझरुल इद्रस याच्या नावावर होता. त्याने 2023 मध्ये चीनविरुद्ध 8 धावा देत 7 बळी घेतले होते. इद्रस व्यतिरिक्त बहरीनच्या अली दाऊदने याच वर्षी भूतानविरुद्ध 19 धावांत 7 बळी मिळवले होते.
टी-20 फॉरमॅटमध्ये (लीग क्रिकेटसह) 7 बळी घेणार्या इतर गोलंदाजांमध्ये नेदरलँडचा कॉलिन अकरमन (2019 मध्ये 7/18) आणि बांगला देशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमद (2025 मध्ये 7/19) यांचा समावेश आहे. येशेने या कामगिरीसह आता या सर्वांना मागे टाकून एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे.