

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांचे बहुचर्चित लग्न आता रद्द झाले आहे. स्मृती मानधनाने स्वतः याबाबत मोठा खुलासा केला आहे. तिने रविवारी (दि. ७) लग्नाची चर्चा रद्द झाल्याचे जाहीर केल्यानंतर, आता पलाश मुच्छल यानेही या नात्यातून मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची इन्स्टाग्रामवरील स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच त्याने अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या चर्चा आणि वादविवादांना पूर्णविराम मिळाला आहे. स्मृतीने एक पोस्ट करत आपले लग्न रद्द झाल्याचे स्पष्ट केले. यावेळी दोन्ही कुटुंबांच्या खाजगीपणाचा आदर करण्याची तिने विनंती केली आहे.
दरम्यान, स्मृतीच्या या घोषणेनंतर काही क्षणांतच संगीतकार पलाश मुच्छल यानेही त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर आपली प्रतिक्रिया जाहीर केली. पलाशने त्याच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, स्मृतीसोबतच्या नात्यातून मागे हटत आहे. आम्ही दोघांनी एकमेकांच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.’
पलाश मुच्छलने त्याची बाजू मांडताना म्हटलंय की, ‘मी आता माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी स्मृतीसोबतच्या नात्यातून रिलेशनशिपमधून मागे हटतोय. जे नातं माझ्यासाठी पवित्र होतं, त्याबद्दल लोक इतक्या सहजतेने निराधार अफवांना खतपाणी घालत होते, हे माझ्यासाठी स्वीकारणं खूप कठीण होतं. लोकांनी अशा प्रकारच्या अप्रमाणित अंदाजाद्वारे आणि गॉसिपच्या आधारावर कोणालाही जज करू नये.’
या पोस्टमध्ये पलाशने अफवा पसरवणाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि भविष्यात कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी पुढे लिहिले की, ‘माझी टीम आता अशा सर्व गैरसमज पसरवणाऱ्या अफवांवर आणि आमच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या गोष्टींविरुद्ध सक्त कायदेशीर कारवाई करेल. आमच्या या कठीण काळात आमच्यासोबत खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो.’