Garfield Sobers | असा अष्टपैलू होणे नाही...

Garfield Sobers |
Garfield Sobers | असा अष्टपैलू होणे नाही...
Published on
Updated on

निमिष वा. पाटगावकर

आजच्या टी-२० क्रिकेटच्या संस्कारात अष्टपैलूची व्याख्या बोथट झाली आहे; पण क्रिकेटच्या इतिहासाचा विचार केला, तर सार्वकालीन सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून एकच नाव डोळ्यांसमोर येईल ते म्हणजे सर गारफिल्ड सोबर्स. क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यात अक्षरशः काहीही करू शकणाऱ्या या क्रिकेटच्या बादशहाने शुक्रवारी या जगाच्या मैदानातून पॅव्हिलियनची वाट धरली आणि सर्व क्रिकेटविश्व हळहळले. सर डोनाल्ड ब्रॅडमन ज्याचे वर्णन पाच खेळाडू एकात असलेला असे ‘फाईव्ह इन वन’ करायचे यापेक्षा मोठे प्रमाणपत्र क्रिकेटमध्ये नसावे. घणाघाती डावखुरा फलंदाज, अशक्य वाटावेत असे झेल सहज पकडणारा क्षेत्ररक्षक आणि तीन प्रकारे म्हणजे उत्तम सिम आणि स्विंगचा प्रयोग करणारा डावखुरा जलदगती गोलंदाज, डावखुरा मंदगती किंवा डावखुरा मनगटी फिरकी टाकू शकणारा गोलंदाज असे पंचरत्नांचे गुण या एकाच हिऱ्यात सामावले होते. असा खेळाडू संघात असायला कर्णधाराची नक्कीच पुण्याई असली पाहिजे. वेस्ट इंडिज क्रिकेटने अनेक दशके जो दबदबा जागतिक क्रिकेटवर गाजवला त्यात सर गारफिल्ड सोबर्स यांच्या वीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतल्या ९३ कसोटी सामन्यांचे मोठे योगदान आहे.

सर गॅरी सोबर्स निव्वळ उत्तम अष्टपैलू खेळाडू नव्हते, तर त्यांच्याकडे क्रिकेट सामने जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या मनात काय चालले आहे, हे ओळखून डावपेच रचायची उत्तम जाण होती. आजच्या स्पोर्टस्‌ सायकोलॉजीच्या जमान्यात हे ज्ञान त्यांना उपजत होते. याचे उत्तम उदाहरण सांगताना जेफ्री बॉयकॉट सांगतात, एकदा इंग्लंडला खेळात असताना जेफ्री सोबर्सना म्हणाले, मला तू वारंवार पायचीत बाद करत आहेस. आपल्या तंत्राबद्दल अत्यंत अभिमान असणाऱ्या जेफ्रीना सोबर्सनी सांगितले, मला वाटत नाही तुझे तंत्र तितकेसे निर्दोष आहे. कारण, फ्रंटफूट खेळताना तू ॲक्रॉस खेळतोस आणि तुझी बॅट पॅडच्या मागे येते. माझा इनस्विंगर तुला पायचीत करायला पुरेसा असतो. हे बॉयकॉटच्या डोक्यात इतके बसले की, या चर्चेच्या पुढच्याच दिवशी सोबर्स विरुद्ध खेळताना बॉयकॉट अशा इनस्विंगची अपेक्षा करत असताना सोबर्सने पहिलाच चेंडू आऊटस्विंग टाकून बॉयकॉटना स्लिपमध्ये झेलबाद करवले. त्या काळातले क्रिकेटही सभ्य लोकांचा खेळ होता तेव्हा मैदानावर आणि मैदानाबाहेरही सोबर्स हे निव्वळ क्रिकेटप्रेमींचेच नव्हे तर प्रतिस्पर्ध्यातील खेळाडूंचेही दैवत होते.

वेस्ट इंडिजने ही क्रिकेटची मक्तेदारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या सधन आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त देशांविरुद्ध गाजवली आणि त्यात सोबर्स यांचा वाटा आमूलाग्र होता. मी जेव्हा २०२४ च्या टी-२० विश्वचषकाच्या दौऱ्यानिमित्त वेस्ट इंडिजला गेलो होतो तेव्हा प्रथम काय जाणवले असेल ते म्हणजे इथल्या या बेटांवर सर्वच सोयींची माफक उपलब्धता. वेस्ट इंडिज क्रिकेटपटूंकडे आजही पैसा नाही आणि तेव्हाही नव्हता. निव्वळ आपल्या नैसर्गिक गुणवत्तेवर त्यांनी जगावर राज्य केले. कधी कधी वाटते या हिऱ्यांना जर शास्त्रशुद्ध पैलू पाडता आले असते, तर काय बहार आली असती; पण नको हे नैसर्गिक चमकणेच अनपेक्षित असल्याने त्यात दरवेळी चकित करायची ताकद होती.

बार्बाडोस ही तर क्रिकेटची पंढरी. निव्वळ बार्बाडोसच्या खेळाडूंचा संघ काढला, तर तो आजही सर्वोत्तम असेल. सर गारफिल्ड सोबर्स ज्या घरात इतकी वर्षे राहिले त्या घराला मी भेट दिली. इतक्या छोट्याशा गल्लीतील या घरात वडिलांशिवाय आपल्या बाकीच्या पाच भावंडांसमवेत राहताना लहान गॅरीने जे फळकूट मिळेल, त्याची बॅट केली आणि आपले क्रिकेट चालू केले. सोबर्स यांच्या बार्बाडोसमधल्या नव्या प्रशस्त घरालाही मी भेट दिली आणि क्रिकेटचा हा राजा आता चांगल्या घरात आल्याचं पाहून बरे वाटले. बार्बाडोसला भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यावर मी प्रेसबॉक्स सोडून मैदानात धाव घेतली. तो सर्व विजयसोहळा डोळ्यांत भरून पाहताना एका सीमारेषेवरून बार्बाडोच्या पंतप्रधान एका अतिशय थकलेल्या व्यक्तीला घेऊन मैदानात येत होत्या. ती व्यक्ती म्हणजे क्रिकेटचा देव साक्षात सर गारफिल्ड सोबर्स होते. एका देशाच्या पंतप्रधानांबरोबर असतानाही मी पुढे जाऊन त्यांना भेटलो आणि वाकून नमस्कार केला. मी मुंबईहून आलो आहे, हे सांगून त्यांना त्यांच्याबरोबर फोटो काढून घ्यायची इच्छा आहे सांगितली. हल्ली ते फोटो देत नाही असे ऐकून होतो; पण अतिशय निर्मळ हसून त्यांनी फोटो काढायची परवानगी दिली. समोर विश्वचषक विजयाचा अविस्मरणीय क्षण आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या देवाला प्रत्यक्ष भेटायचा अविस्मरणीय क्षण.

आषाढीच्या महिन्यात आमच्या या क्रिकेटच्या देवाच्या या पालखीनेही बार्बाडोसहून आपले प्रस्थान केले. अष्टपैलू म्हणजे काय याचा अर्थ समजायला आजच्या अष्टपैलूंनी सर गारफिल्ड सोबर्स यांच्या कारकिर्दीचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरले आहे. या महान अष्टपैलूला भावपूर्ण श्रद्धांजली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news