

India test squad for england 2025 : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (दि. २४) घोषणा केली. युवा फलंदाज शुभमन गिल याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी ऋषभ पंतची निवड झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नव्या जोमाने २० जूनपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला भिडणार आहे.
बीसीसीआयने कर्णधार म्हणून शुभमन गिल यांच्यावर विश्वस दाखवला आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीमध्ये २५ वर्षीय शुभमन गिल याचे नाव आघाडीवर होते. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराह उपकर्णधार होता आणि तो एक नैसर्गिक दावेदार असल्याचे मानले जात होते. तसेच केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याही नावाची चर्चा होती.
विराट कोहलीने निवृत्ती घेतल्याने टीम इंडियाची मधील फळी ही अनुभवहीन झाली आहे. आता विराट कोहलीची जागा घेण्यासाठी निवडकर्त्यांचे लक्ष साई सुर्दशन, श्रेयस अय्यर आणि करुण नायर यांच्यावर असल्याची चर्चा होती. अखेर करुण नायर टीम इंडियात पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव ज्युरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना २० जून रोजी हेडिंग्ले, लीड्स येथे होणार आहे. यानंतर दोन्ही संघ २ जुलै रोजी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे आमने-सामने असतील. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणार्या लॉर्ड्स मैदानावर मालिकेतील तिसरी कसोटी खेळली जाईल. तर २३ जुलैला ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे तर ३१ जुलैपासून केनिंग्टन ओव्हल येथे अनुक्रमे चौथी आणि पाचवी कसोटी होणार आहे.
या मालिकेत गिल पहिल्यांदाच कसोटी संघाचे नेतृत्व करणार असून, त्याच्यावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील (WTC 2025-27) पहिल्या मालिकेत दमदार कामगिरी करण्याची मोठी जबाबदारी आहे. गिलने यापूर्वी झिम्बाब्वे दौऱ्यावर टी-20 मालिकेत यशस्वी कर्णधारपद भूषवले असून, आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सला गुणतक्त्यात अव्वल स्थानावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गिलच्या नेतृत्वाखालील हा युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल संघ इंग्लंडच्या आव्हानाला कसे सामोरे जाणार, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.