

विजयवाडा (आंध्र प्रदेश); वृत्तसंस्था : वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अनुभवी श्रुती मुंदडा, पारुल चौधरी आणि उदयोन्मुख खेळाडू तन्वी पत्री यांनी आपल्यापेक्षा सरस मानांकित प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचा धक्का देत महिला एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
श्रुती मुंदडाने सातव्या मानांकित जिया रावतचा 21-14, 21-9 असा सरळ सेटमध्ये पराभव करत तिला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. दुसर्या एका चुरशीच्या लढतीत पारुल चौधरीने नवव्या मानांकित खेळाडूवर 18-21, 21-18, 21-12 अशी मात करत पुढील फेरीत प्रवेश केला. त्याचप्रमाणे, युवा तन्वी पत्रीने आठव्या मानांकित ईशाराणी बरुआचे आव्हान 22-20, 21-19 असे संपुष्टात आणले. याव्यतिरिक्त उन्नती हुडा, अनुपमा उपाध्याय, अनमोल खरब आणि तन्वी शर्मा यांनीही पुढची फेरी गाठली.
पुरुष एकेरीमध्ये आर्यमान टंडनने मोठी उलटफेर करत तिसर्या मानांकित एम. रघूचा 17-21, 21-11, 21-14 असा पराभव केला. अभिनव गर्ग आणि ऋत्विक संजीव एस. यांनीही अनपेक्षित विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.