पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसीने मंगळवारी (दि. १५ एप्रिल) मार्च २०२५ महिन्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. टीम इंडियाचा मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने मार्च महिन्यातील प्रतिष्ठेचा 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ' (ICC Men’s Player of the Month) पुरस्कार जिंकला. त्याने दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे. याआधी त्याला २०२२ मधील फेब्रुवारीत हा पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे भारताने सलग दुसऱ्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले. याआधी फेब्रुवारीत शुभमन गिल प्लेयर ऑफ द मंथ ठरला होता. श्रेयस अय्यरने पुरुष खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडच्या जेकब डफी आणि रचिन रवींद्र जोडीला मागे टाकत हा पुरस्कार जिंकला.
श्रेयस अय्यरने भारताला चॅम्पियन ट्रॉफी जिंकून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने मार्च महिन्यात एकूण ३ एकदिवसीय सामने खेळले. त्यात त्याने ५७.३३ च्या सरासरीने १७२ धावा केल्या होत्या. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील न्यूझीलंड विरुद्धच्या ग्रुप ए मधील एका सामन्यात ७९ धावा आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४५ धावांची खेळी केली होती. त्याने अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध ४८ धावा करत भारताला चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली.
तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाची जॉर्जिया वोल हिची आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी निवड केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात तिने स्फोटक फलंदाजी केली होती.
वोल हिने तिच्याच देशाच्या (ऑस्ट्रेलिया) अॅनाबेल सदरलँड आणि अमेरिकेच्या चेतना प्रसाद यांना मागे टाकत प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारावर नाव कोरले. वोल ही प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकणारी सलग चौथी ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू ठरली आहे.