

Shoaib Malik Divorce :
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचा माजी पती शोएब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो त्याच्या कोणत्या वक्तव्यामुळं किंवा क्रिकेटबाबतच्या बातमीमुळं चर्चेत आला नसून त्याच्या तिसऱ्या पत्नीबाबतच्या वृत्तामुळं चर्चेत आला आहे.
शोएब मलिक हा आपल्या तिसऱ्या पत्नीला देखील घटस्फोट देणार असल्याचं वृत्त आलं आहे. पाकिस्तानी माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार शोएब मलिक आणि सना जावेद यांचा संसार तुटण्याची शक्यता आहे. सना आणि शोएब यांनी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता सना शोएबपासून घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे.
शोएब मलिक आणि सना जावेद यांच्यात सर्व काही ठीक सुरू नाहीये अशी माहिती मिळत आहे. शोएब मलिक हा पाकिस्तानचा माजी कर्णधार आहे. त्यानं भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत लग्नगाठ बांधली होती. हे त्यांचं दुसरं लग्न होतं. सानिया सोबत शोएब मलिकचा संसार हा १४ वर्षे चालला. त्यानंतर मलिकचं सना जावेद सोबत सूत जुळलं. या दोघांनी २०२४ मध्ये लग्न केलं.
मलिक आणि सना गेल्या दोन वर्षात सार्वजनिक ठिकाणी चांगल्या जोडप्यासारखं वावरत होते. शोएब मलिक पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत असताना सना त्याला प्रोत्साहन देताना दिसत होती. मात्र आता या दोघांमध्ये फारसं बरं चाललं नसल्याचं समजतंय.
सना आणि शोएब मलिक हे एकमेकांपासून अंतर ठेवून वागत आहेत असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मलिक आता तिसरा घटस्फोट घेणार अशा चर्चांना ऊत आला आहे. या व्हिडिओत मलिक ऑटोग्राफ देताना दिसतोय. मात्र सना तोंड फिरवून बसली होती. ते एकमेकांशी बोलत देखील नव्हते. अनेक चाहत्यांना या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं जाणवत होतं.
तर काही चाहत्यांच्या मते पती पत्नीमध्ये जशी नॉर्मल भांडणं असतात तसंच हे भांडण असावं असा अंदाज व्यक्त करत आहेत. दरम्यान, ना शोएब मलिक ना सना जावेद यांनी याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे.