

पुढारी ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपांत्य सामन्यात व अंतिम सामन्यात पंचाचा निर्णय मान्य न करता गोंधळ घातल्याप्रकरणी कुस्ती संघटनेने शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड या दोन्ही पैलवानांवर कारवाई केली. महाराष्ट्र कुस्तीगिर संघटनेने या दोघांवर तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी ही माहिती दिली. शिवराज राक्षे याने पंचाना लाथ मारल्याचया निषेधार्थ स्पर्धेतील पंचानी मैदानावरच आंदोलन केले.
अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ व महेंद्र गायकवाड यांच्या लढतीत गायकवाड याने पंचाचा निर्णय अमान्य केला. निकाल जाहीर झाल्यानंतर गायकवाड व त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. गायकवाड याने ऑब्जेक्शन घेताच त्याचे सहकारी समर्थक आखाड्यावर चढले, तर दुसरीकडून मोहोळ याचे देखील समर्थक आखाड्यावर चढल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मल्लांच्या समर्थकांवर सौम्य लाठीचार्ज केला.
दरम्यान उपांत्य लढतीत शिवराज राक्षे, पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली होती. यामध्ये पृथ्वीराजने राक्षे याच्यावर मात केली. या कुस्तीला वादाचे गालबोट लागले. राक्षे याने हा निकाल अमान्य केला शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर धरली व लाथही मारली होती. गायकवाड याने पंचाना उद्देशून अरेरावीची भाषा वापरली होती. दोन्ही घटनेनंतर कुस्तीगिर संघटनेने दोघांवर ३ वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.