

रिफा (बहारीन); वृत्तसंस्था : भारताची 16 वर्षीय धावपटू शौर्था अंबुरे (महाराष्ट्र) हिने येथे सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये 100 मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक जिंकून आपला 2025 चा उत्कृष्ट फॉर्म कायम राखला आहे. अंतिम फेरीत तिने 13.73 सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत मोठी कामगिरी केली. दरम्यान, शुक्रवारी भारताने या स्पर्धेत ट्रॅक आणि फिल्डमध्ये तीन पदके जिंकली. यामध्ये शौर्य अंबुरेसह पलाश मंडल आणि जस्मिन कौर यांचा समावेश आहे.
शौर्यासाठी हे रौप्यपदक खूप महत्त्वाचे ठरले. कारण, यंदाच्या हंगामातील हे तिचे तिसरे मोठे आंतरराष्ट्रीय पदक आहे. यापूर्वी तिने भुवनेश्वर येथील राष्ट्रीय ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आशियाई 18 वयोगटाच्या चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवले होते. आशियाई स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तिची हीटमधील वेळ 14.00 सेकंद होती. परंतु, अंतिम फेरीत तिने 13.73 सेकंदांपर्यंत सुधारणा केली, जी तिचा दबावाखाली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आत्मविश्वास दाखविते.
भारताच्या पलाश मंडलने 5000 मीटर चालण्याच्या शर्यतीत 24 मिनिटे 48.92 सेकंद (24:48.92) वेळेची नोंद करत कांस्यपदक मिळविले. चीनच्या खेळाडूंनी या शर्यतीत वर्चस्व राखले. हाओझे झांगने 21:43.82 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर यूजी लू याने 22:28.64 सेकंद वेळेसह रौप्यपदक पटकावले. दरम्यान, भारताच्या जस्मिन कौरने महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्यपदक संपादन केले. तिने 14.86 मीटर गोळाफेक केली. तिची सहकारी जॉय बैदवान 14.53 मीटरसह सहाव्या स्थानावर राहिली.
भारतीय खेळाडूंची अन्य क्रीडा प्रकारांतील कामगिरी अशी : महिला 400 मीटर हीट: एडविना जेसन (55.71 सेकंद) आणि तन्नू (57.54 सेकंद) या दोघींनी उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली. पुरुष 400 मीटर हीट : रामू लोंडगे याने 49.62 सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष 100 मीटर हीट : दिव्यांश राज (11.01 सेकंद) आणि निखिल कमल (11.16 सेकंद) यांनी पुढील फेरी गाठली. मात्र, उपांत्य फेरीत ते बाहेर पडले.