

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाने डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खानच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिले आहे. मोहसिन खान दुखापतीमुळे TATA इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या 18व्या हंगामातून बाहेर गेला आहे. याची माहिती 'आयपीएल' व्यवस्थानपनाने सोशल मिडीया हँडल 'एक्स'वर पोस्ट करत दिली आहे.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये शार्दुलला कोणीही आपल्या संघामध्ये खरेदी केले नव्हते. यानंतर त्याने रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली चषकामध्ये चांगली कामगिरी केली. यानंतर मोहसिन खानच्या जागी त्याला संघात सामील करण्यात आले आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू असलेल्या शार्दुल ठाकूरची नोंदणी नोंदणीकृत उपलब्ध खेळाडूंच्या पूलमधून (Registered Available Player Pool - RAPP) त्याच्या राखीव किमतीवर म्हणजेच 2 कोटी रुपयांना करण्यात आली आहे. भारतासाठी तीनही फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ठाकूरकडे IPL मध्येही मोठा अनुभव आहे. त्याने आतापर्यंत 95 IPL सामने खेळले असून, पाच वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी योगदान दिले आहे.