पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी करणार्या पाकिस्तान क्रिकेट संघांवर देशातून चौफेर टीका सुरु असताना देशातील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही एक हास्यास्पद प्रकार घडला आहे. सामन्या दरम्यान फलंदाज सौद शकील ड्रेसिंग रुममध्ये चक्क झोपी गेला. तो फलंदाजीसाठी उशिरा क्रीजवर पोहोचला. त्यामुळे पंचांनी त्याला बाद घोषित केले. पाकिस्तान प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील ही एक दुर्मिळ घटना ठरली आहे. कारण पाकिस्तान प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये टाईम आउट (फलंदाज निर्धारित वेळेत क्रीजवर न पोहचणे ) होणारा शौद शकील हा पहिला पाकिस्तानी फलंदाज ठरला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची नेटिझन्सनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंची खिल्ली उडविण्याची चांगली संधी मिळाली आहे.
पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनी, सौद शकीलने रावळपिंडी येथे झालेल्या देशांतर्गत प्रेसिडेंट्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भाग घेतला. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडून पाचव्या क्रमांकावर तो फलंदाजीसाठी जाणार होता. पाकिस्तान टेलिव्हिजन संघाचा वेगवान गोलंदाज मुहम्मद शहजादने स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा कर्णधार उमर अमीन आणि फवाद आलम यांना सलग चेंडूंवर बाद केले. यानंतर शकील क्रीजवर आला, पण त्याला तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला. रिपोर्टनुसार, तो ड्रेसिंग रूममध्ये झोपी गेला होता त्यामुळे त्याला क्रीजवर जाण्यास विलंब झाला. विरोधी संघाच्या कर्णधाराने टाइम आउटसाठी अपील केले आणि मैदानावरील पंचांनी अपील स्वीकारले आणि सौद शकीलला टाइम आउट घोषित करण्यात आले, ही प्रथम श्रेणीच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना आहे कारण अशा प्रकारे बाद होणारा तो पहिला पाकिस्तानी फलंदाज आहे. गोलंदाज मुहम्मद शहजाद याने दाेन चेंडूत सलग दोन फलंदाजांना बाद केले. तिसऱ्या चेंडूपूर्वी शकीलला टाइमआउट करण्यात आले आणि पुढच्या चेंडूवर शहजादला आणखी एक विकेट मिळाली. अशाप्रकारे त्याने ३ चेंडूत चार विकेट घेतल्या.
शकीलच्या बाद झाल्यानंतर, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध अँजेलो मॅथ्यूजला टाईमआउट केल्याचा उल्लेखही झाला. तो उशिरा क्रीजवर पोहोचल्याने त्याला 'टाईमआउट' घोषित करण्यात आले होते.