‘आरसीबी’ने ‘सीएसके’ला हरवले

CSK vs RCB : अखेर 17 वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्सला चेपॉकवर मिळाला विजय
CSK vs RCB
आरसीबीचा चेन्नईवर ५० धावांनी विजय
Published on
Updated on

चेन्नई : 2008 नंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अखेर चेपॉकवर विजयाची चव चाखली. चेन्नई सुपर किंग्जला इंडियन प्रीमिअर लीग 2025 मध्ये त्यांनी पराभूत केले. 17 वर्षांपूर्वी ‘आरसीबी’ने चेपॉकवर मॅच जिंकली होती, त्यानंतर त्यांना 8 सामन्यांत हार पत्करावी लागली होती; पण रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली ‘आरसीबी’ने शुक्रवारी चमत्कार केला; पण या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित झाले आहेत.

रजत पाटीदारच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगळूरने 7 बाद 190 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात जोश हेझलवूडने दुसर्‍याच षटकात राहुल त्रिपाठी (5) व ऋतुराज गायकवाडला (0) माघारी पाठवले. दीपक हुडा (4) भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर माघारी परतला. सॅम कुरेनही (8) लियाम लिव्हिंगस्टोनला विकेट देऊन बसला. रचिन रवींद्र मैदानावर उभा होता. 13 व्या षटकात यश दयालने त्याचा त्रिफळा उडवला. रचिन 31 चेंडूंत 41 धावांवर बाद झाला. यशने त्याच षटकात शिवम दुबेचा (19) त्रिफळा उडवला.

संघाची अवस्था वाईट होऊनही महेंद्रसिंग धोनी मैदानावर उतरला नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. धोनीने आपल्या पुढे आर. अश्विनला फलंदाजीसाठी प्रमोट केले. धोनीच्या या वागण्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अश्विन 11 (8 चेंडू) धावांवर बाद झाला. धोनी फलंदाजीला आला तेव्हा चेन्नईला 28 चेंडूंत 98 धावा करायच्या होत्या आणि त्या अशक्यच वाटत होत्या. कारण, त्यांच्या 7 विकेटस् गेल्या होत्या. धोनीने 20 व्या षटकात काही उत्तुंग षटकार खेचले. परंतु, चेन्नईचा पराभव टाळण्यासाठी ते पुरेसे ठरले नाही. चेन्नई सुपर किंग्जला 8 बाद 146 धावा करता आल्या आणि बंगळूरने 50 धावांनी हा सामना जिंकला. धोनी 16 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 30 धावांवर नाबाद राहिला. ‘आरसीबी’च्या जोश हेझलवूडने 3, यश दयाल व लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या. बंगळूरचा हा चेन्नईवरील सर्वात मोठा विजय ठरला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा ऋतुराज गायकवाडचा निर्णय सुरुवातीला अंगलट येताना वाटला. फिल सॉल्ट व विराट कोहली यांनी 5 षटकांत 45 धावा फलकावर चढवल्या. नूर अहमदने ही भागीदारी तोडली आणि सॉल्ट 16 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 32 धावांवर बाद झाला. महेंद्रसिंग धोनीने स्टम्पिंग करून ही विकेट मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या देवदत्त पडिक्कलने आक्रमक फटकेबाजी केली; पण देवदत्त 14 चेंडूंत 27 धावा करून आर. अश्विनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. ऋतुराजने त्याचा अप्रतिम झेल टिपला.

मैदानावर टिकून राहिलेला विराट हळूहळू आक्रमक खेळ करू लागला होता; पण नूर अहमदने त्याचाही काटा काढला. विराट 30 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 31 धावा करून माघारी परतला. या ‘आयपीएल’मधील ही स्ट्राईक रेटच्या बाबतीत सर्वात संथ खेळी ठरली. ‘आरसीबी’ कर्णधार रजत पाटीदारला दोन जीवदान देण्याची चूक ‘सीएसके’ला महागात पडली. त्याने 30 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

लियाम लिव्हिंगस्टोनला (10) मोठी खेळी खेळण्यापासून नूरने रोखले. 20 वर्षीय फिरकीपटूने 4-0-36-3 असा स्पेल टाकला. रजत 32 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचून 51 धावांवर झेलबाद झाला. खलील अहमदने 4 षटकांत 28 धावा देताना 1 विकेट घेतली. 18 व 19 व्या षटकात बंगळूरचे तीन फलंदाज माघारी पाठवून त्यांच्या धावांवर लगाम लावला गेला. पथिराणाने 19 व्या षटकात संथ चेंडूचा चांगला मारा करताना 1 धाव दिली आणि दोन विकेट मिळवल्या. टीम डेव्हिडने शेवटच्या षटकांत 3 षटकार खेचले आणि संघाला 7 बाद 196 धावांपर्यंत पोहोचवले.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : 20 षटकांत 7 बाद 196 धावा. (रजत पाटीदार 51, फिल सॉल्ट 32. नूर अहमद 3/36.)

चेन्नई सुपर किंग्ज: 20 षटकांत 8 बाद 146 धावा. (रचिन रवींद्र 41, महेंद्रसिंग धोनी 30 नाबाद. जोश हेझलवूड 3/21.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news