

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात आणखी एका युवा तार्याचा उदय झाला असून, रोहित कृष्ण एस. हा भारताचा 89 वा ग्रँडमास्टर बनला आहे. कझाकस्तान येथे झालेल्या अल्माटी मास्टर्स कोनाएव चषक स्पर्धेत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत 9 पैकी 6 गुणांची कमाई करत त्याने ग्रँडमास्टरसाठी आवश्यक असलेला अंतिम नॉर्म पूर्ण केला आणि 2,500 एलो रेटिंगचा महत्त्वाचा टप्पाही पार केला.
या बहुमानावर शिक्कामोर्तब करण्यासाठी रोहितने अंतिम फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर आर्टर डेव्हट्यानचा पराभव केला. त्याच्या या यशामागे प्रशिक्षक के. विश्वेश्वरन यांचे मार्गदर्शन आहे. रोहितच्या या कामगिरीमुळे भारतीय बुद्धिबळात युवा खेळाडूंची वाढती मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात नागपूरची दिव्या देशमुख भारताची 88 वी ग्रँडमास्टर ठरली होती. त्यामुळे एका महिन्याच्या आत भारताला दोन नवीन ग्रँडमास्टर मिळाले आहेत.
ग्रँडमास्टर हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघातर्फे दिला जाणारा सर्वोच्च किताब आहे. हा किताब मिळवण्यासाठी खेळाडूला किमान 2,500 एलो रेटिंग मिळवावे लागते आणि तीन ग्रँडमास्टर नॉर्म्स (विशिष्ट स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीचे निकष) पूर्ण करावे लागतात. रोहितने हे सर्व निकष पूर्ण करत या प्रतिष्ठित पंक्तीत स्थान मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे भारतीय बुद्धिबळातील युवा प्रतिभेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.