

Rohit Virat Future 2027 OD1 World Cup:
आगामी दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेनंतर भारतीय संघाचा वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हंगाम जवळपास संपुष्टात येत आहे. त्यानंतर बीसीसीआय या मालिकेनंतर संघ व्यवस्थापन आणि निवडसमितीची एक बैठक आयोजित करण्याची शक्यता आहे. यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्याबाबत एक ठोस योजना तयार करण्यात येण्याची शक्यता आहे. हा प्लॅन २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून केला जाईल.
टाईम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार बीसीसीआयचे उच्च अधिकारी, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडसमिती प्रमुख अजित आगरकर अहमदाबादमधील तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान एकत्र बसतील. आगामी वनडे वर्ल्डकपच्या तयारीबाबत रोहित अन् विराट कोहलीसंदर्भात अजून चर्चा सुरू नाहीये याच पार्श्वभूमी संघ व्यवस्थापनानं या दोघांच्या बॅकअप खेळाडूंचा शोध घेण्यावर काम सुरू करावं असा सल्ला देण्यात आला आहे.
बीसीसीआय सूत्राने सांगितले की, 'विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या खेळाडूंना त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे आणि संघ व्यवस्थापन त्यांच्या भूमिकेकडं कसं पाहत आहे याची स्पष्टता देणं अत्यंत गरजेचं आहे. ते अनिश्चिततेत खेळत आहेत असं होऊ नये.' बीसीसीआने रोहित शर्माला भविष्याबाबत प्रतिक्रिया देण्याऐवजी त्याच्या फिटनेस आणि कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यास देखील सांगितलं आहे असं बीसीसीआय सूत्रानं सांगितलं.
बीसीसीआय या दोघांबद्दलची काळजी निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाकडं बोलून दाखवण्याची शक्यता आहे. हे दोघे मोठ्या ब्रेकनंतर संघात परतल्यावर मैदानावर कसे धावत आहेत आणि कसे रिकव्हर होत आहेत याबाबत काळजीत आहे. कारण हे दोघे फक्त एक फॉरमॅट खेळत आहेत.
सूत्राने सांगितलं की, 'ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेत पहिल्या दोन सामन्यात हे दोघे थोडे अडखळत खेळताना दिसले. तिसऱ्या सामन्यात त्यांनी धावा केल्या मात्र मालिका आधीच गमावली होती. तिसऱ्या सामन्यात गोलंदाजांनी पहिल्या डावात सामन्यावर पकड मिळवून दिली होती.
दरम्यान, विराट अन् रोहितला विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही स्पर्धा पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहे. जानेवारी महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका देखील खेळणार आहे. त्यानंतर संघ थेट जुलै महिन्यात इंग्लंडविरूद्ध वनडे सिरीज खेळेल.