

मुंबई : भारतीय वन-डे संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या जोरदार तयारी करत आहे. याच तयारीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, त्याने यादरम्यान चक्क 10 किलो वजन घटवले असून, गुरुवारी त्याचा नवा लूक सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला.
आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी हा मुंबईकर अनुभवी फलंदाज जिममध्ये कठोर परिश्रम घेत आहे. रोहितने आपला जवळचा मित्र आणि माजी भारतीय सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेऊन 10 किलो वजन कमी केले आहे. नायरने रोहितचा हा ‘न्यू लूक’ सोशल मीडियावर शेअर केला असून, फोटोला कॅप्शन दिले आहे की, 10,000 ग्रॅम कमी झाले; पण आम्ही अजूनही जोर लावत आहोत. रोहित शेवटचा भारतीय संघाकडून यावर्षी मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने सामनावीर ठरणार्या खेळीच्या जोरावर संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.